भय्यू महाराजांनी आध्यात्मिक निवृत्तीची घोषणा केली होती कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 06:55 PM2018-06-12T18:55:40+5:302018-06-12T19:06:33+5:30
इंदौर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक व परमार्थिक ट्रस्टचे सर्वेसर्वा भय्यू महाराज यांनी कोल्हापुरात १३ एप्रिल २०१६ रोजी आध्यामिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते.
कोल्हापूर : इंदौर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक व परमार्थिक ट्रस्टचे सर्वेसर्वा भय्यू महाराज यांनी कोल्हापुरात १३ एप्रिल २०१६ रोजी आध्यामिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र या अनपेक्षित निर्णयामुळे भय्यू महाराज यांच्या भक्तांना धक्का बसला आणि पत्रकार परिषदेतच काही भक्तांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला होता. आपल्या मनातील वेदना, अस्वस्थता भय्यू महाराजांनी कोल्हापुरांसमोर व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या.
आध्यात्मिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती स्वीकारणे म्हणजे विरक्ती नव्हे, नैराश्यही नाही. माझ्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी काही करण्याची ताकद आता माझ्यात राहिलेली नाही, त्यांच्यासाठी यापुढे काही करू शकणार नाही म्हणूनच आपण हा निर्णय घेतला असल्याचे भय्यू महाराज यांनी त्यावेळी सांगितले. माझा कोणावर आक्षेप नाही, कोणाच्या विरोधात तक्रारही नाही. समाजातील दु:ख पाहतो, पण ती सोडवू शकत नाही, एवढेच शल्य आपल्याला आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले होते.
देशात अनेक ठिकाणी मोठे कुंभमेळे होतात, कोट्यवधी रुपये खर्च होतात पण विदर्भ, मराठवाड्यात एखादा कुं भमेळा का होत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. रोहित विमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याचे राजकारण केले जाते.
उस्मानाबाद येथील दलित दाम्पत्याने आत्महत्या केल्यावर त्याच्या मुलांना मदत केली जात नाही, हे दुर्दैव आहे. एकेका महाराजांकडे हजारो कोटींचा निधी आहे, पण दुसरीकडे सामाजिक कार्य करणाऱ्या माझ्यासारख्या महाराजाकडे पैसा नाही. स्वत: जवळचे पैसे लावून तरी किती काळ काम करणार, हा प्रश्न आहे. माझ्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे माझ्यासारख्याला कामे थांबवावी लागत आहेत. यापुढे काम करू शकणार नाही, अशी हतबलता त्यांनी बोलून दाखविली होती.
भय्यू महाराजांच्या डोळ्यात अश्रू
समाजात अनेक प्रकारची दु:खं आहेत. ज्या-ज्यावेळी आपण फिरती करतो, त्यावेळी लोकांची ही दु:खं जवळून पाहतो. मन उद्दिग्न होते. मनात इच्छा असूनही त्यांची दु:खे सोडवू शकलो नाही. कसं जगायचं लोकांनी? असा प्रश्न उपस्थित करत भय्यू महाराज भावनिक झाले. क्षणभर बोलायचे थांबले. त्यांना रडू कोसळले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर आहेत. त्यांच्या जागी मी असतो आणि त्यांचं दु:ख माझ्या वाटणीला आलं असतं तर काय वाटले असते याचा विचार मी करतो, असे सांगत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती.
नऊ दिवस झोपले नाहीत
आध्यात्मिक कार्यातून निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी तब्बल नऊ दिवस मला झोप लागली नाही. सतत नऊ दिवस रात्रभर मी विचार करत होतो. आपली ज्यांना गरज आहे, त्यांना जर मी मदत करू शकणार नसेन तर मग या क्षेत्रात कशाला काम करायचे, हा प्रश्न मला भेडसावत होता. माझ्यातील काम करण्याची ताकद संपली आहे याची जाणीव झाली म्हणूनच मी या क्षेत्रातून निवृत्ती घेत आहे, असेही भय्यू महाराज यांनी सांगितले.
मुकुटाला पाच कोटी, मात्र पाण्यासाठी नाही
शिर्डीच्या साईबाबांच्या मस्तकावर मुकुट घालण्यासाठी समाजातील दानशुरांकडे पाच कोटी रुपये असतात, परंतु शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करायला त्यांच्याकडे पैसे नाहीत, हा विसंगतपणा आहे, अशा शब्दांत भय्यू महाराज यांनी टीका केली होती.
बाजारीकरणाचा प्रभाव
समाजातील प्रत्येक क्षेत्रातील बाजारीकरणावरही भय्यू महाराज यांनी जोरदार प्रहार केला होता. धर्माच्या नावाने लोकांना गुलाम बनवायला मला आवडत नाही. समाजावर बाजारीकरणाचा प्रभाव असेल तर माझ्यासारख्या नीतीमत्ता असणाऱ्या माणसांनी जायचं कुठे, असा सवाल करत सामाजिक व्यस्थेत बदल होणे आवश्यकता बोलून दाखविली होती.
कोल्हापुरात अनेक भक्तगण
भय्यू महाराज यांचे कोल्हापुरात अनेक भक्तगण आहेत. सगळे भक्तगण हायप्रोफाईल आहेत. त्यामुळे भय्यू महाराज यांचे कोल्हापुरात येणे जाणे होते. येथील भक्तगण त्यांच्या सामाजि कार्याशी संबंधित होते. १३ एप्रिल २०१६ रोजी ते कोल्हापुरात आले होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या निवास्थानी दुपारी पोहचले. त्याआधी मिलींद धोंड यांना पत्रकार परिषद घ्यायची असल्याने तसे निरोप पत्रकारांना द्या अशी सुचना केली होती. त्यांनी दुपारी महाडिक यांच्या निवासस्थानी भोजनही घेतले.
पन्हाळा येथील शिवजन्म सोहळ्याला आवर्जून उपस्थित
पन्हाळा येथील पन्हाळा येथे २००६ ला शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भय्यू महाराजांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी पन्हाळा येथील शिवमंदिरात आयोजित शिवजन्म सोहळ्याला ते आवर्जून उपस्थित होते. यावेळी पन्हाळा येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कुराडे यांचा भय्यू महाराज यांनी सत्कार केला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे उपस्थित होते.