भेडसगाव येथे एकाच दिवसात ४५ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:31 AM2021-04-30T04:31:55+5:302021-04-30T04:31:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क : भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे गुरुवारी कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा उद्रेक झाला असून एकाच दिवसात ४५ जणांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क :
भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे गुरुवारी कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा उद्रेक झाला असून एकाच दिवसात ४५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने भेडसगावसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली. गावातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचली असून बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
भेडसगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत चालल्याने गुरुवारी कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या सुमारे १३२ नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. निजामवाडी परिसरात सर्वांत जास्त रुग्ण आढळून आल्याने हा परिसर पूर्णपणे सील केला आहे. एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने प्रशासन यंत्रणाही सतर्क झाली आहे. सायंकाळी आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी, पोलीस निरीक्षक विजय पाटील, डॉ. नरेंद्र माळी यांनी गावातील सर्व पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, सेविका यांची तातडीची बैठक घेऊन कोरोनाचा समूह संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गावात योग्य त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
X चौकट X
भेडसगाव येथील समूह संसर्गामुळे वाढत चाललेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता हे गाव ११ मे पर्यंत पूर्णपणे बंद ठेवले जाणार असून गावातील सर्व आस्थापना, व्यवसाय बंद ठेवले जातील. खासगी डॉक्टरांनी स्वॅब देऊनच आपले दवाखाने चालू ठेवावेत. स्वॅब तपासणी केल्याशिवाय कोणालाही आपले व्यवसाय चालू करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- गुरू बिराजदार, तहसीलदार.