राजकारणातील भीष्माचार्य हरपले : चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 06:42 PM2018-08-16T18:42:26+5:302018-08-16T18:47:46+5:30

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने कणखर व्यक्तिमत्त्व आणि कवितेचा अंतर्वाद जपणारा, राजकारणातील भीष्माचार्य राष्ट्रनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

Bhishmaacharya's defeat in politics: Chandrakant Dada Patil's reaction | राजकारणातील भीष्माचार्य हरपले : चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

राजकारणातील भीष्माचार्य हरपले : चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देराजकारणातील भीष्माचार्य हरपले  चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली

कोल्हापूर :  माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने कणखर व्यक्तिमत्त्व आणि कवितेचा अंतर्वाद जपणारा, राजकारणातील भीष्माचार्य राष्ट्रनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी कविमनाचे हळवे असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर होते. त्यांचे अमोघ वक्तृत्व मनाला मोहिनी घालणारे होते. जनसामान्यांची मन जिंकण्याच्या कौशल्यावर आणि भाषाशैलीची विलक्षण ताकद वापरून सभा जिंकणारा एक नेता होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या या नेत्याची विचारसरणी व वृत्ती मात्र सर्वांना सांभाळून घेण्याची होती. उच्चविद्याविभूषित घराण्यांत जन्मलेल्या वाजपेयी यांचा संस्कृताचा गाढा अभ्यास होता.

एक सच्चा स्वातंत्र्यसैनिक, खंदा पत्रकार, पट्टीचा वक्ता आणि बिनीचा राजकीय नेता कवितेचा अंतर्वाद जपणारा राष्ट्रनेता म्हणून साऱ्या जगात त्यांची ओळख होती. त्यांचे राजकारण व त्यांच्या वक्तृत्त्वचा अभ्यासकांना उपयुक्त असे विपुल पुस्तके, लेख उपलब्ध आहेत. येणाऱ्या असंख्य पिढीला ते मार्गदर्शक असणार आहे.

वाजपेयी यांची राजकारणातील भीष्माचार्य म्हणून अधिक ओळख होती. भारतीयांची प्रतिष्ठा चाणाक्ष राजनीतीने जगात उंचावण्याचे काम त्यांनी केले. विविध अंगांनी बहरलेले वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतीय लोकशाहीचा मानदंड होते.

स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या वाजपेयी यांच्यासाठी राष्ट्रहित सर्वोच्च होते. प्रखर राष्ट्रवादी नेता आणि बहुपक्षीय संसदीय कार्यपद्धतीतून उदयास आलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख असली तरी लोकशाही मूल्यांवर श्रद्धा असलेले वाजपेयी त्यांनी नेहमी सर्वसहमतीचे राजकारण केले.

देशातील एक प्रेरणादायी व सहिष्णुतेचे प्रतीक म्हणून त्यांची ओळख होती. भारतीय राजकारणातील सर्वांत कसोटीच्या काळात नैतिकतेचा आदर्श राखत वाजपेयी यांनी संसदीय प्रणालीचा मान राखत देशाचे नेतृत्व केले.


वाजपेयी हे स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेले नेते होते. 1942 च्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही पत्करला होता. आणीबाणीच्या काळातही ते काही महिने तुरुंगात होते. वाजपेयी यांनीच भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांमधील आपल्या जुन्या सहकाऱ्यांना म्हणजे लालकृष्ण अडवानी, भैरोसिंह शेखावत यांच्यासारख्यांना अनेकांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थापना केली. आणि  वाजपेयी भाजपचे पहिले अध्यक्ष बनले.

1984 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे दोनच संसद सदस्य निवडून आले होते. त्यानंतर भाजपने मुख्य प्रवाहाचे राजकारण करत, संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत नेले आणि देशातील युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम केलेच, शिवाय कॉंग्रेसविरोधातील प्रबळ विरोधी पक्ष असल्याची प्रतिमा ही निर्माण केली.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदू परिषद यांनी धसास लावलेल्या रामजन्मभूमी मंदिर आंदोलनात राजकीय पक्ष म्हणून भूमिका मांडण्यात अटलबिहारी वाजपेयी आघाडीवर होते. अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर उभारावे, असा आग्रह होता. गुजरातमध्ये भाजपच्या बाजूने मिळालेला कौल, महाराष्ट्रात 1995 मध्ये शिवसेनेच्या मदतीने भाजपचे सत्तेवर येणे आणि डिसेंबर 1994 मध्ये कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेले यश यामुळे भाजपचे राजकीय भवितव्य देशात उठून दिसू लागले.

मे 1998 मध्ये पोखरण येथे आण्विक चाचणी घेऊन भारताने जगातल्या निवडक देशांत आपले स्थान निर्माण केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कटुता कमी करून उभयतांमधील चर्चेला नवे वळण देणे आणि तिढा सोडविण्याच्या प्रयत्नाला गती देण्यासाठी फेब्रुवारी 1999 मध्ये उभय देशांमधील बससेवेला गती देण्यात आली.

भारताच्या या प्रामाणिक प्रयत्नाचे जगभरातून कौतुक झाले. भारताने पुढे केलेल्या या मैत्रीच्या हाताला झिडकारत पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी करून घातकी राजकारण केले; तेव्हा वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली चोख प्रत्युत्तर देण्यात येऊन भारतीय भूमीवरील हल्ला परतवून लावण्यात आला.

जगभरात मंदीची लाट असताना वाजपेयींच्या नेतृत्वाखाली 1998-99 मध्ये भारताने एकूण राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) 5.8 टक्के वाढ केली, ती आधीच्या वर्षापेक्षा जास्त होती. वाढलेले शेती उत्पादन आणि परकीय चलनाच्या साठ्यात झालेल्या वाढीने देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळत असल्याचे संकेत मिळाले.

एकविसाव्या शतकात भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या नेत्याने सरकार पातळीवर अनेक धाडसी निर्णय घेतले. ग्रामीण अर्थकारण सक्षम करण्याचा प्रयत्न केला. पायाभूत सुविधांच्या विस्ताराला चालना दिली, मानवी साधनसंपत्ती विकासाला प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय चतुष्कोन महामार्ग जोडण्याचा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लक्षणीय ठरला. पद्मविभूषणापासून ते भारतरत्नपर्यंत अनेक पुरस्कार त्यांनी मिळाले.


देशात शांतता हवी, असे त्यांचे धोरण होते. पाकिस्तानसह शेजारील देशांबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे मानले जाते. त्यांची वाडमयसेवा, कवितासंग्रह, नयी दिशा आणि संवेदना हेही अत्यंत गाजले.

Web Title: Bhishmaacharya's defeat in politics: Chandrakant Dada Patil's reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.