भोगावती’त पुन्हा सत्ताधाऱ्यांचीच सत्ता; ‘पी. एन.’, ‘ए. वाय.’, संपतरावांची बाजी
By विश्वास पाटील | Published: November 20, 2023 05:39 PM2023-11-20T17:39:18+5:302023-11-20T17:41:01+5:30
‘उदयसिहं कौलवकरांचा’ धक्कादायक पराभव : २५ पैकी २४ जागांवर विजयी : ‘परिवर्तन’चा सुपडासाफ
कोल्हापूर/भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘शेकाप’चे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडी’ने २५ पैकी २४ जागांवर दणदणीत विजयी मिळवला.
निवडणुकीत सत्तारूढ आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केलेल्या माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवशाहू परिवर्तन आघाडी’चा सुपडासाफ झाला. कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडीचे नेते धैर्यशील पाटील हे जाईंट किलर ठरले; पण त्यांना सत्ता मिळविण्यात अपयश आले. सोमवारी रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. विजयानंतर सत्तारूढ गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष केला. गावोगावी रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी झाली.
‘भोगावती’च्या २५ जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात हाेते. रविवारी अत्यंत चुरशीने २७ हजार ५६२ पैकी २३ हजार ७९३ (८६.३३ टक्के) मतदान झाले. सोमवारी सकाळ आठपासून कोल्हापुरातील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली. मत नोंदविण्यावरून गोंधळ उडाल्याने प्रक्रिया थांबली होती, मात्र मोजणी कर्मचारी बदलल्यानंतर प्रक्रिया सुरळीत झाली. कौलव गटापासून मोजणीला सुरुवात झाली. येथे शाहू शेतकरी आघाडीचे २४ उमेदवार सरासरी ३५०च्या मताधिक्याने पुढे होते. उदयसिंह पाटील-कौलवकर हे मागे पडत गेले आणि धैर्यशील पाटील हे एकटेच २५ जणांत घुसले.
दुपारी तीन-चारपर्यंत हे मताधिक्य १७५० पर्यंत गेले. पहिल्या फेरीच्या अंतिम निकालाअंती संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडीचे उमेदवार व शाहू आघाडीच्या उमेदवारांमध्ये सरासरी १५३० चे मताधिक्य राहिले. येथे मात्र धैर्यशील पाटील यांनी ‘कौलव’ गटात सर्वाधिक ४५११ मते घेतली, तर उदयसिंह पाटील हे १४९० मतांनी मागे होते.
दुसऱ्या फेरीत करवीर तालुक्यातील केंद्रावरील मोजणी करण्यात आली. यामध्ये सत्तारूढ आघाडीचे २४ उमेदवार आघाडीवरच राहिले. उदयसिंह पाटील यांच्यावरील मताधिक्य कमी होत गेले, पण रात्री पावणेअकरा वाजता धैर्यशील पाटील हे ११०० च्या मताधिक्याने पुढे होते. रात्री बारा वाजेपर्यंत मोजणीची प्रक्रिया सुरू राहिली. अखेर सत्तारूढ आघाडीचे २४ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. पहिल्या फेरीपासून पिछाडीवर राहिलेले उदयसिंह पाटील यांना धैर्यशील पाटील यांची आघाडी तोडता आली नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील धायगुडे, प्रेमदास राठोड, मिलिंद ओतारी यांनी काम पाहिले.
कौलवकर चुलत्या-पुतण्यात शेवटपर्यंत चुरस
या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे अध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु, मागील पाच वर्षांतील कारभारातून त्यांच्याबद्दल सत्तारूढ गटातच प्रचंड नाराजी होती. त्यामुळे त्यांना टार्गेट करून राधानगरी तालुक्यातूनच वगळण्यात आले. करवीर तालुक्यातून सत्तारूढ गटाला पॅनल टू पॅनल मतदान झाल्याने राधानगरीतील भरपाई करवीरमध्ये होऊन ते विजयी होतील, असा होरा होता. परंतु ,तसे घडले नाही. राधानगरी तालुक्याने त्यांना वगळून कारखान्याच्या संस्थापकांचे नातू म्हणून धैर्यशील पाटील यांना संधी दिली. चुलत्या-पुतण्यातील चुरस शेवटच्या मतापर्यंत राहिली.
एकास एक लढत झाली असती तर निकाल वेगळा..
या निवडणुकीत तीन पॅनल होऊन मतविभागणी झाल्याचा फायदा सत्तारूढ गटाला झाला. माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील व सदाशिव चरापले यांनी एकत्रित येऊन एकच पॅनल करून आव्हान दिले असते तर सत्तांतर झाले असते, असे आकडेवारीवरून दिसते.