kolhapur: भोगावती कारखान्याच्या निवडणुकीस अखेर स्थगिती; राज्यातील सर्वच निवडणुका लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 12:29 PM2023-06-29T12:29:05+5:302023-06-29T12:29:33+5:30
लोकमत’ने २१ जूनलाच ही निवडणूक स्थगित होणार असल्याचे वृत्त दिले होते
भोगावती : राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने पावसाळा आणि खरीप हंगाम सुरू झाल्याने राज्यातील सर्व निवडणुका बुधवारी, दि.३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या. त्यामुळे परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही लांबणीवर गेली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन छाननी होण्याअगोदर निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला. आता पावसाळ्यानंतर याच टप्प्यापासून निवडणूक कार्यक्रम सुरू होऊन मतदान होण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ने २१ जूनलाच ही निवडणूक स्थगित होणार असल्याचे वृत्त दिले होते.
भोगावती कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम २० जूनपासून सुरू झाला आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत २७ जूनपर्यंत होती. संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ४८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज गुरुवारी छाननी, १४ जुलैपर्यंत माघार आणि ३० जुलैला मतदान होणार होते. खरेतर पावसाळ्याचे कारण देऊन राज्य शासनाने भोगावतीच्या सीमेवर असलेल्या बिद्री कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हाच त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते.
बिद्री कारखाना निवडणूक लांबणीवर ढकलण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात गेला आहे. त्याची सुनावणी सोमवारी (दि.३ जुलै) होणार आहे. तोपर्यंत शासनाने सगळ्याच निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता कारखान्याचा साखर हंगाम, लोकसभेची रणधुमाळी व त्यातच कारखान्याची निवडणूक होणार आहे.
- राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था : ८२ हजार ६३१
- मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या संस्था : ४९ हजार ३३३
- अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध संस्था : ४८ हजार ६६७
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण : ४२ हजार १५७
- निवडणूक प्रक्रिया सुरू : ६ हजार ५१०
सहकार विभागाच्या आदेशानुसार भोगावती कारखान्याचा गुरुवार (दि.२९ जून)पासूनचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्यामुळे छाननी प्रक्रिया होणार नाही. नवीन सुधारित निवडणूक कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होईल. त्यानुसार पुढील निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. -नीळकंठ करे, निवडणूक निर्णय अधिकारी भोगावती सहकारी साखर कारखाना परिते (ता. करवीर)