‘भोगावती’चे पाच कोटी कर्ज माफ करणार : सुरेश हाळवणकर
By admin | Published: April 17, 2017 07:21 PM2017-04-17T19:21:57+5:302017-04-17T19:21:57+5:30
कारखान्याला कॉँग्रेसरूपी कॅन्सरपासून वाचवा : चंद्रदीप नरके
आॅनलाईन लोकमत
सडोली खालसा , दि. १७ : ‘भोगावती’ कारखान्यावरील कर्जाची चिंता कॉँग्रेसच्या नेतेमंडळींनी करू नये, ५३ कोटी पैकी पाच कोटी सरकारच्या माध्यमातून माफ करणार असल्याचे आश्वासन आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिले.कारखान्यातील ५८० कर्मचाऱ्यांनी काळजी करू नये, त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
सडोली खालसा (ता. करवीर) येथे महाआघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शंकर पाटील होते. काही मंडळींना ‘भोगावती’ची सत्ता भानगडी करण्यासाठी हवी आहे. पण, राज्य सरकारने अशा भानगडखोरांचा प्रतिबंध करण्यासाठी अनेक कडक कायदे आणल्याचे सांगत आमदार हाळवणकर म्हणाले, पी. एन. पाटील यांनी ‘भोगावती’च्या कारभाराबाबत बोलण्याआधी त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असताना काय दिवे लावले, हे अगोदर सांगावे. सत्तारूढ गटाच्या कारभाराबाबत अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे; पण संचालकांची मुदत संपल्यामुळेच कारखान्यावर प्रशासक आले.
राज्यात कॉँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी कारखान्याची चौकशी लावली; पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, केवळ बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, कॉँग्रेसच्या काळातील कारभार अजूनही सभासदांच्या स्मरणात राहिला आहे. कारखान्यावरील कर्जाच्या गप्पा मारणाऱ्यांच्या काळात खऱ्या अर्थाने कारखाना आर्थिक अडचणीत आला. अशा कॉँग्रेसरूपी कॅन्सरपासून कारखान्याला वाचवा. चांगले आणि वाईट हे ‘भोगावती’च्या सभासदांना कळते, त्यामुळे कोणी कितीही पारदर्शकतेच्या गप्पा मारल्या तरीही महाआघाडीच मोठे मताधिक्य घेऊन सत्तेवर येईल, असा विश्वास माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.
माजी आमदार संपतराव पवार, प्रा. जालंदर पाटील, अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब देवकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुरेश पाटील, धैर्यशील पाटील, केरबा भाऊ पाटील, नामदेव पाटील, सुनील कारंडे, शंकर पाटील, अॅड. संभाजी पाटील, रघुनाथ जाधव, संजय कलिकते, एम. आर. पाटील, श्रीपती पाटील, विष्णू पाटील, आदी उपस्थित होते.