‘भोगावती’ची ‘दौलत’ होणार नाही ना?

By admin | Published: June 21, 2016 09:42 PM2016-06-21T21:42:31+5:302016-06-22T00:17:11+5:30

सभासदांकडून भीती : नेतेमंडळींकडून राजकीय स्वार्थापोटी कारखान्यावरील कर्जावरून चिखलफेक

'Bhogavati' will not be 'wealth'? | ‘भोगावती’ची ‘दौलत’ होणार नाही ना?

‘भोगावती’ची ‘दौलत’ होणार नाही ना?

Next

आमजाई व्हरवडे : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखाना एकेकाळी देशात व राज्यात अव्वलस्थानावर होता. या कारखान्याच्या जिवावर अनेकांनी अनेक सत्ता भोगल्या. देशात अव्वल असणारा हा कारखाना राजकारण्यांनीच डबघाईला आणला हे सर्वांना माहीत आहे. हीच मंडळी आज राजकीय स्वार्थापोटी कारखान्यावरील कर्जाबाबत चिखलफेक करत आहेत. या राजकीय चिखलफेकीमुळे ‘भोगावती’ची दौलत होणार नाही ना अशी भीती सभासदांतून व्यक्त होत आहे.
एकेकाळी भोगावती साखर कारखाना देशात अव्वलस्थानावर होता. या कारखान्याचा अनेकांनी साखर कारखाना उभा करताना आदर्श घेतला. पूर्वीच्या राजकारण्यांनी ‘भोगावती’ला आपले कुटुंब मानून तो सांभाळला होता. कोट्यवधी रुपये पूर्वी शिल्लक असायचे. कारखान्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचेल असा कारभार कधी जुन्या मंडळींनी केला नाही. पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरून ऊस वाहतूक असल्याने वाहतुकीचाही खर्च जास्त होत नसायचा. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून अलीकडच्या राजकारण्यांना विस्तारीकरणाचे वेध लागलेत. त्यांचा हेतूही योग्य होता. मात्र, चांगला हेतू कारखान्याचा फायदा करू शकला नाही. विस्तारीकरण झाले. त्याचा फायदा कारखान्याला पाहिजे तेवढा झाला नाही. विस्तारीकरणामुळे आजही कारखाना आर्थिक संकटातून जात आहे. ‘भोगावती’ला कोणी आर्थिक संकटात आणले. कोणाच्या काळात कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, आज जी दोन्ही काँग्रेसकडून कारखान्याच्या कर्जाबाबत चिखलफेक सुरू आहे ती योग्य नाही. कोण म्हणते कारखान्यावर तीनशे कोटींचे, तर कोण शंभर कोटींचे, तर कोण सत्तर कोटींचे कर्ज आहे असे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. देशात व राज्यात दोन्ही काँग्रेस विरोधी सरकार आहे. सध्याचे सरकार हे खासगीकरणाला प्राधान्य देणारे आहे. या दोन्ही काँग्रेसच्या चिखलफेकीची दखल सरकारने घेऊन कारखान्याचा दहा-पंधरा वर्षांच्या कारभाराची चौकशी लावली तर सर्वांचीच अंडीपिल्ली बाहेर पडण्यास वेळ लागणार नाही. सरकारने जर आक्रमक भूमिका घेतली कारखान्याचे भवितव्य काय होईल हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या मंडळींनी शांत बसणेच शहाणपणाचे होईल. ज्यावेळी निवडणूक लागेल त्यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू देत. मात्र, निवडणूक कधी लागणार हे माहीत नसताना कारखान्याची दोन्हींकडून बदनामी योग्य नाही. ‘भोगावती’च्या कर्जाच्या आरोप- प्रत्यारोपांमुळे कारखान्याची सर्वत्र बदनामी झाली. याचे विपरीत परिणाम कारखान्याला अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांनी हात आखडते घेतले तर कारखान्याची अवस्था दयनीय होईल. दौलत साखर कारखाना तेथील तीन पाटलांच्या राजकारणानेच डबघाईला आला. त्यांच्या राजकारणामुळे दौलत बंद पडली. त्याचे परिणाम तेथील शेतकऱ्यांवर झाले. तेथील शेतकरी आज उभा राहणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे येथील राजकरण्यांनी शहाणे होण्याची वेळ आली आहे.


कारखाना हिताचे काम
‘भोगावती’च्या राजकारणाचा अनेकांनी फायदाच जास्त घेतला. माजी आमदार गोविंदराव कलिकते व संपतराव पाटील पदावरून पायउतारा होताना भोगावतीत दहा कोटी रुपये शिल्लक ठेवले होते. तो जुना काळच वेगळा होता. मात्र, अलीकडच्या राजकारण्यांनी कारखान्याच्या हितापेक्षा आपले व सत्ता सोय याचेच हित जास्त जोपासले. आज जी मंडळी कारखान्यावर आरोप-प्रत्यारोप करत सुटले आहेत, ती धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहेत का? मग का कारखान्याची बदनामी करत सुटला, असा संतप्त सवाल सभासदांतून विचारला जात आहे.

भोगावती साखर कारखान्याची सत्ता गेल्या सहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात आली. त्यावेळी २८ कोटींचे कर्ज कारखान्यावर होते. मात्र, आज सत्तारूढ मंडळींनी हे कर्ज माल तारणावरील कर्ज वगळता दुप्पट केले आहे. हे निश्चित आगामी हंगामात दीडशे कोटी कर्जाचा बोजा घेऊन गळीत हंगाम सुरूकरावा लागणार आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर ‘भोगावती’ची ‘दौलत’ होण्यास वेळ लागणार नाही.
- जालंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: 'Bhogavati' will not be 'wealth'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.