भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूक घेण्यास तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:22 AM2021-03-08T04:22:55+5:302021-03-08T04:22:55+5:30
भोगावती : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची पाच वर्षांपूर्वीची निवडणूक झाल्यापासूनच हे शिक्षण मंडळ सभासदांच्या मालकीचे झालेले आहे. मात्र, त्यानंतर ...
भोगावती : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची पाच वर्षांपूर्वीची निवडणूक झाल्यापासूनच हे शिक्षण मंडळ सभासदांच्या मालकीचे झालेले आहे. मात्र, त्यानंतर घटना दुरुस्तीला होणारा विरोध पाहता सभासदांचे हक्क अबाधित राखण्यासाठी सभासदांच्या इच्छेनुसार मुदत संपण्याच्या अखेरीस पुन्हा स्वतंत्र निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे यांनी केले.
येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची सन २०१९-२० ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी कुरुकली (ता. करवीर) येथील कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेत जनार्दन पाटील, सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. जालंदर पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. घटना दुरुस्ती का केली नाही? यावर अध्यक्ष हुजरे यांनी संचालक मंडळ व सुकाणू समितीमध्ये मत मतांतरे झाल्याने घटना दुरुस्ती झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर धैर्यशील पाटील-कौलवकर, केरबा भाऊ पाटील व अजित पाटील यांनी शिक्षण संस्थेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली. यासंदर्भात बोलताना अध्यक्ष हुजरे यांनी यापूर्वीच्या घटना दुरुस्तीच्या असफल प्रयत्नांची माहिती दिली. अशावेळी एका सभासदाने जरी तक्रार केली तरीही न्यायालयीन वाद होत असत. त्यामुळे शिक्षण संस्थेचे अस्तित्व वेगळे ठेवण्यासाठी व सभासदांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबविण्यास आम्ही तयार आहोत, असे जाहीर केले.
या ऑनलाईन सभेत सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील यांनी आपण दिलेला ‘शब्द’ पाळू शकलो नाही, याबद्दल सर्व सभासदांची दिलगिरी व्यक्त केली. शिक्षण प्रसारक मंडळाची घटना दुरुस्ती करण्यास निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र चार वर्ष होऊनसुद्धा शिक्षण प्रसारक मंडळाचे घटना दुरुस्ती झाली नाही. याबाबत आता मतमतांतरे सुरू झाली आहेत, असे स्पष्ट केले.
स्वागत संचालक बबन पाटील यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक एन डी डोंगळे यांनी केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचन सचिव शामराव कोईगडे यांनी केले. सभेस उदय चव्हाण, पांडुरंग कवडे, बंडोपंत वाडकर, मारुतराव पाटील, गोविंदा चौगुले, पुष्पा पाटील, शैलजा पाटील, सरदार पाटील, बबन पाटील, मच्छिंद्रनाथ पाटील, विलास पाटील आदी संचालक उपस्थित होते. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी आभार मानले
भोगावती शिक्षण मंडळ वार्षिक सभा फोटो ओळी : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या ऑनलाईन वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष जयसिंगराव हुजरे, सोबत उपाध्यक्ष सर्जेराव पाटील व संचालक मंडळ. भोगावती शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी कटिबद्ध अध्यक्ष जयसिंगराव हुजरे