भोगावतीच्या सभासदांचा आमच्यावर दृढ विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:17+5:302021-03-04T04:47:17+5:30
भोगावती : परिते (ता.करवीर) येथील भोगावती साखर कारखाने १२.२५ साखर उतारा राखत पावणे पाच लाख टन गाळप पूर्ण केले. ...
भोगावती :
परिते (ता.करवीर) येथील भोगावती साखर कारखाने १२.२५ साखर उतारा राखत पावणे पाच लाख टन गाळप पूर्ण केले. हा सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. अशा परिस्थितीत कोणीही राजकारण न करता कारखान्याच्या हितासाठी संवाद साधून निर्णय घेऊ असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर आणि संचालक मंडळाने पत्रकार बैठकीत केले आहे.
कारखान्याची वार्षिक सभा येथे शनिवारी ऑनलाइन होत आहे.या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी या पद्धतीला विरोध दर्शवत सभासदांच्या उपस्थितीत सभा घ्यावी ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्याचा संचालक मंडळाने खुलासा केलेला आहे.
उपाध्यक्ष पाटील म्हणाले, सभासदांच्या उपस्थित ही सभा घेतली जावी यासाठी अध्यक्ष आ. पी. एन. पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून प्रयत्न केला. मात्र शासनाच्या स्पष्ट आदेशामुळे ही सभा ऑनलाइन घेण्याबाबत सांगितले गेले आहे. सभा जरी ऑनलाइन होत असली तरी सभासदांना बोलण्याचा आणि प्रश्न उपस्थित करण्याचा दिलेला हक्क अबाधित राहणार आहे.
भोगावतीचा सभासद साखरेचा दर इतर कारखान्यांच्या तुलनेत बरोबर असून कारखान्याला अंदाजे वीस हजार सभासद ऊस न घालता सभासद साखरेचा लाभ घेत आहेत. याचा कारखान्याला आर्थिक फटका बसत आला आहे.याबाबत वारंवार चर्चा देखील झालेली होती.सध्या तोडणी मजुरांचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रभर गंभीर होऊ लागला आहे.म्हणून आम्ही जास्तीत जास्त यांत्रिकीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यापूर्वीचे देणे असणारे २५० चे ऊस बिल आम्ही विसरलेलो नाही.
कारखान्याच्या परिसरात असणाऱ्या झाडांची मुळे ही लोक वस्तीतील घरांमध्ये शिरलेली होती. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणत वाढ झाली होती. त्यामुळे ती तोडावी लागली,असाही खुलासा केला आहे.
या पत्रकार बैठकीला माजी उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, प्रा..ए.डी.चौगले, कृष्णराव किरूळकर, प्रा.सुनील खराडे,शिवाजी कारंडे,पांडुरंग पाटील,बी.आर.पाटील कार्यकारी संचालक के.एस.चौगले आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.