कोल्हापुरात भोंदूबाबाचा पर्दाफाश; करणी काढण्यासाठी ६५ हजारांची मागणी, तिघांना अटक
By उद्धव गोडसे | Published: October 28, 2023 07:03 PM2023-10-28T19:03:19+5:302023-10-28T19:05:33+5:30
कोल्हापूर : नातेवाईकांनी करणी केल्याचे सांगून, ती काढण्यासाठी ६५ हजार रुपये घेणा-या भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ...
कोल्हापूर : नातेवाईकांनी करणी केल्याचे सांगून, ती काढण्यासाठी ६५ हजार रुपये घेणा-या भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शाहूपुरी पोलिसांच्या मदतीने केले. शिवाजी पार्क येथील फ्रेंड्स कॉलनीत शनिवारी (दि. २८) दुपारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भोंदू बाबा पंडित विनायक शास्त्री याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या शिवाजी पार्क येथील फ्रेंड्स कॉलनीत एका भोंदू बाबाकडून लोकांची फसवणूक होत असल्याची माहिती अंनिसच्या पदाधिका-यांना मिळाली होती. याची खात्री करण्यासाठी अंनिसच्या सीमा पाटील या स्वत: शुक्रवारी (दि. २७) खोटी तक्रार घेऊन विनायक शास्त्री या भोंदू बाबाकडे गेल्या. 'कोरोना काळात पैशांची गरज होती, त्यामुळे दहा लाख रुपये हातउसने घेऊन मी माझ्या दिराला जमीन दिली होती. आता ते पैसे घेत नसून, जमिनीचा ताबा देण्यास टाळाटाळ करीत आहेत,' अशी तक्रार पाटील यांनी केली. यावर 'तुमच्या दिराने करणी केली असून, ती काढण्यासाठी ६५ हजार रुपये द्यावे लागतील. त्यानंतर दीर स्वत:हून येऊन तुम्हाला जमिनीचा ताबा देईल,' असे भोंदू बाबाने सांगितले.
पाटील यांनी हा सर्व प्रकार पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कानावर घातला. शाहूपुरी पोलिसांच्या मदतीने स्टिंग ऑपरेशनची तयारी करून शनिवारी दुपारी बोंदूबाबा विनायक शास्त्री याला ६० हजार रुपये घेताना पकडण्यात आले.