..परंतु आम्ही 'तसे' कदापी होऊ देणार नाही, जरांगे-पाटील यांचे छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 01:36 PM2024-08-10T13:36:51+5:302024-08-10T13:38:05+5:30
कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते सत्तेसाठी रॅली काढत आहेत, त्यांच्या रॅली आरक्षणासाठी किंवा जनतेच्या प्रश्नासाठी नाहीत. बांगला देशासारखी ...
कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते सत्तेसाठी रॅली काढत आहेत, त्यांच्या रॅली आरक्षणासाठी किंवा जनतेच्या प्रश्नासाठी नाहीत. बांगला देशासारखी अराजकता महाराष्ट्रात आरक्षणावरून घडावी असे छगन भुजबळ यांच्यासह काहीजणांना वाटते, परंतु आम्ही कदापी तसे होऊ देणार नाही, कारण हे राज्य आमचे आहे, असे टीकास्त्र मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी सोडले. करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एक मराठा लाख मराठा, अशा कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या गजरात शुक्रवारी मराठा योद्धा जरांगे-पाटील करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. तत्पूर्वी नर्सरीबागेतील समाधिस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसमोर ते नतमस्तक झाले. त्यांच्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक होते.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. शांतता रॅलीसाठी ते शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मार्गदर्शन केल्यानंतर ते नर्सरी बागेतील शाहू महाराजांच्या समाधिस्थळावर आले. याठिकाणी समाधीच्या पायरीवर नतमस्तक होत त्यांनी शाहूंच्या समाधीवर पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आहे, त्याला सुटी नाही असे ठणकावून सांगितले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, मावळा ग्रुपचे अध्यक्ष उमेश पोवार, चंद्रकांत पाटील, नीलेश चव्हाण, संदीप पाटील, शाहीर दिलीप सावंत, सुशील भांदिगरे, अवधूत पाटील, मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, अमरसिंह पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.