अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच पूरक्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे, भूपाल शेटे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:08 IST2020-05-28T19:06:06+5:302020-05-28T19:08:01+5:30
महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने भ्रष्टाचार करून पूरक्षेत्रातील परिसरात बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला आहे. तसेच अशा बांधकामांची परवानगी त्वरित रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शेटे यांनी गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले.

अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच पूरक्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे, भूपाल शेटे यांचा आरोप
कोल्हापूर : महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने भ्रष्टाचार करून पूरक्षेत्रातील परिसरात बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला आहे. तसेच अशा बांधकामांची परवानगी त्वरित रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शेटे यांनी गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले.
वडनेरे समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल दिला आहे. यामध्ये पूरक्षेत्रातील अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे महापुराला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. रेड झोनमध्ये तसेच पूरस्थितीच्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीर बांधकामांना भ्रष्टाचार करून परवानगी दिल्याचे यावरून पुन्हा स्पष्ट होत आहे.
याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांनी शहरातील नालेही बुजवून बांधकामे केली आहेत. पूरक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून बेकायदेशीरपणे परवानगी दिलेल्या ठिकाणी भराव टाकून बांधकामे करणे सुरूच आहे. अशा बांधकामांची परवानगी तत्काळ रद्द करावी, असे निवेदनात म्हटले आहे.