तज्ज्ञ संचालकपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी!
By admin | Published: July 21, 2016 09:03 PM2016-07-21T21:03:00+5:302016-07-21T21:03:00+5:30
आजरा साखर कारखाना : सोमवारी निवड; लॉटरी कोणाला?
ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा -आजरा साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक निवडीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २५) कारखाना संचालकांची विशेष बैठक होत असून, इच्छुकांची असणारी भाऊगर्दी, समोर असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आणि कारखाना निवडणुकीत ‘तज्ज्ञ’ संचालकपदाचे दिले गेलेले शब्द, या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडी नेतेमंडळींच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणार आहेत.
अत्यंत अटीतटीने दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कारखाना निवडणुकीवेळी सत्ता मिळविण्यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करताना सध्या सत्तेत असणाऱ्या महाआघाडीच्यावतीने अनेकांना स्वीकृत संचालकपदाबाबत शब्द दिले गेले आहेत, तर आघाडीतील काही निष्ठावान व प्रमुख मंडळींना निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागले आहे. तज्ज्ञ संचालकपदी दोघांना संधी देण्यात येणार आहे. मात्र, इच्छुकांची संख्या सुमारे पंधराच्या आसपास आहे. यामध्ये गवसे-पेरणोली उत्पादक गटातील अनेकजण यासाठी इच्छुक दिसतात. सद्य:स्थितीत यामध्ये उत्तूर-मडीलगे गटातील विश्वनाथ करंबळी यांची निवड निश्चित समजली जाते. ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्या माध्यमातून त्यांच्या निवडीत काही अडथळा दिसत नाही.
उर्वरित संचाकलपदाच्या एका जागेची निवड मात्र आघाडीप्रमुखांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणार आहे. पेरणोली येथील ज्येष्ठ नेते श्रीपतराव देसाई व कारखान्याचे माजी संचालक सहदेव नेवगे हे प्रमुख स्पर्धक समजले जातात. श्रीपतराव देसाई यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांचा विचार प्राधान्याने होण्याची शक्यता आहे.
या सर्व चर्चेत राजू होलम, प्रकाश कोंडुसकर, बापूसाहेब सरदेसाई, प्रकाश कुंभार, मुकुंदराव तानवडे, अबुताहेर तकिलदार यांचीही नावे येत आहेत. परंतु, समोर असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका व स्थानिक राजकारण पाहता विश्वनाथ करंबळी, श्रीपतराव देसाई व सहदेव नेवगे या तिघांपैकी दोघांना या पदाची ‘लॉटरी’ लागणार असे दिसत आहे.
टप्प्यांचाही विचार
कारखाना तज्ज्ञ संचालकपदी दोन टप्प्यांत चौघांना संधी देण्याबाबतही महाआघाडीच्या नेतेमंडळींचा विचार असल्याचेही पुढे येत असून, उद्या, शनिवारी याबाबत महाआघाडीचे सत्तारूढ संचालक व नेत्यांची बैठक होणार आहे.