भुये, भुयेवाडीतून जाणार चार प्रस्तावित रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:23 AM2021-03-31T04:23:24+5:302021-03-31T04:23:24+5:30

कोपार्डे : एक-दोन नव्हे तर तब्बल चार प्रस्तावित रस्ते भुये, भुयेवाडी या गावांतून जाणार असल्याने येथील शेती, ...

Bhuye, four proposed roads passing through Bhuyewadi | भुये, भुयेवाडीतून जाणार चार प्रस्तावित रस्ते

भुये, भुयेवाडीतून जाणार चार प्रस्तावित रस्ते

Next

कोपार्डे : एक-दोन नव्हे तर तब्बल चार प्रस्तावित रस्ते भुये, भुयेवाडी या गावांतून जाणार असल्याने येथील शेती, स्थावर मालमत्ता व नैसर्गिक स्थळांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही गावे प्राधिकरणात असल्याने भविष्यात ही गावे शहरात जाणार आहेत. यामुळे या गावांची ओळख पुसली जाण्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

भुये व भुयेवाडी गावातून राज्य मार्ग १९४ हा रस्ता कार्यरत आहे. सध्या प्रस्तावित असलेला रत्नागिरी-नागपूर-राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, कोकण रेल्वे, सुंदर जोतिबा विकास योजनेअंतर्गतचा रस्ता हे चार रस्ते या दोन गावांतूनच जाणार आहेत. प्राधिकरणात ही दोन्ही गावे असल्याने ती भविष्यात शहरात येणार आहेत. यामुळे या गावातील शेती, पशुपालन व्यवसाय अडचणीत येणार आहे.

रस्त्यासाठी भूसंपादनात घरे, नैसर्गिक जलस्त्रोतातील विहिरी, कूपनलिका नष्ट होणार आहेत. शिवाय ओढे, नाले, ओघळ या नैसर्गिक स्त्रोतांची स्थळ पाहणीच केली गेलेली नाही.

वारणा कोडोली ते वाठार असे नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन होते. ते बदलून केर्ली, भुयेवाडी, भुये, शिये या दाट लोकवस्ती व कसदार शेती असलेल्या भागातून करण्यात आल्याने या गावच्या शेती व स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान होणार आहे. सुंदर जोतिबा या योजनेतील रस्ताही याच गावातून प्रस्तावित आहे. याशिवाय प्राधिकरणात या दोन्ही गावांचा समावेश असल्याने या गावांची ओळख पुसली जाण्याची भीती भूशास्त्रीय अभ्यासक अभिजित पाटील यांनी व्यक्त केली.

कोट : प्रस्तावित महामार्गाच्या रेखांकनात प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम, स्थानिक सुपीक शेतीचा जैवअधिवास, जोतिबा डोंगररांगेतून पंचगंगा नदीस मिळणाऱ्या प्रवाहाची जलनिस्सारण प्रणाली, त्यामुळे तयार होणारे पूरप्रणव क्षेत्र तसेच शेकडो हेक्टर बागायती शेतीस उपलब्ध होणारे उपसा व भूजल सिंचन यांना होणारी बाधा याचा कुठेही उल्लेख, अभ्यास अथवा निरीक्षण केल्याचे दिसत नाही.

- प्रा. डॉ. अभिजित पाटील, भूवैज्ञानिक

कोट : शिये ते भूयेवाडी हा भाग भविष्यात होऊ घालणारे नवे शहर आहे. राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, कोकण रेल्वेमार्ग, प्राधिकरण अंतर्गत होणारे प्रकल्प या सर्वांसाठी या एकाच भागावरती होणारे अन्यायकारक भूसंपादन शासनाच्या विविध विभांगामध्ये समन्वय ठेवल्यास टाळले जाऊ शकते. -

सुभद्रा पाटील, महिला शेतकरी

कोट : महामार्गाच्या अधिसूचनेवरती शेतकरी व ग्रामस्थ यांनी दिलेल्या लेखी हरकतीबाबत पारदर्शकपणे सुनावणी होणे गरजेचे आहे. महामार्गाला विरोध नाही. नियोजनशून्य प्रकल्प व स्थळ पाहणी न करता केलेल्या रेखांकनास विरोध आहे.

आनंदराव पाटील, प्रगतशील शेतकरी. भूयेवाडी.

Web Title: Bhuye, four proposed roads passing through Bhuyewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.