‘बिद्री’त दादा, मुश्रीफ, के. पी. यांची गट्टी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:30 AM2017-08-11T00:30:12+5:302017-08-11T00:30:12+5:30

'Bidri' in Dada, Mushrif, K. P. The bandage is possible | ‘बिद्री’त दादा, मुश्रीफ, के. पी. यांची गट्टी शक्य

‘बिद्री’त दादा, मुश्रीफ, के. पी. यांची गट्टी शक्य

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात ‘गट्टी’ जमल्याचे समजते. गुरुवारी सकाळी त्यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बोलणी झाली आहेत. यावेळी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर व राहुल देसाई हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात ‘भाजप-राष्ट्रवादी युती’चा नवा पॅटर्न आकार घेऊ लागला आहे.
बिद्री साखर कारखान्यात आता गेली दीड वर्षे प्रशासक मंडळ अस्तित्वात आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्याने तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच हे मंडळ नियुक्त केले आहे. त्यांनी हा कारखाना उत्तम पद्धतीने चालविला आहे. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेच कारभार असू दे, अशाही भावना सभासदांतून मध्यंतरी व्यक्त झाल्या; परंतु आता कारखान्यास निवडणुकीचे वेध लागले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. के. पी. पाटील यांच्या गटाने केलेले वाढीव ९८२० सभासद अपात्र ठरविले व ४७०२ मतदारांना पात्र ठरविले आहे. आॅक्टोबरमध्ये निवडणुकीचा धुरळा उडण्याची चिन्हे आहेत.
आताच्या राजकारणात तिथे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव, विजय मोरे, संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे यांचे पॅनेल होणार हे नक्की आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांच्या तालुक्यातील हा कारखाना असल्याने त्यांना तिथे कोणत्याही स्थितीत भाजपचा सत्तेत शिरकाव हवा आहे. कदाचित पालकमंत्री पाटील हे आगामी विधानसभेला राधानगरी-भुदरगड या मतदारसंघातील उमेदवारही असू शकतात तशी चर्चाही विविध व्यासपीठांवरून अधून-मधून सुरू आहे. भाजपचे त्या तालुक्यात अजूनही म्हणावे तेवढे मजबूत संघटन नाही. त्यामुळे हा पक्ष स्वबळावर रिंगणात उतरू शकत नाही. त्या पक्षाच्या त्या मर्यादा आहेत. विरोधी आमदार आबिटकर यांच्याशीही पालकमंत्र्यांचे फारसे जमत नाही शिवाय संजय मंडलिक यांनाही सोबत घेणे ‘दादां’ना अडचणीचे आहे. कारण अगोदरच त्यांनी महाडिक गटाला राजकीय सोबतीला घेतले आहे. अशा स्थितीत ‘सोयीची युती’ म्हणून हा नवा घरोबा आकारास येत आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कुणी कोणत्या पक्षाबरोबर युती करावी याला काय बंधन नसते, असेही कारण त्यासाठी पुरेसे आहेच.
भाजपची राष्टÑवादीबरोबर
आघाडी शक्य
कागल तालुक्यातील समरजित घाटगे भाजपवासी झाल्यामुळे त्यांना काही जागा द्याव्याच लागतील. शिवाय गतनिवडणुकीत विरोधी असलेला माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगाच राहुल सध्या भाजपमध्ये आहे. त्यामुळे सहा-सात जागा पदरात पाडून घेऊन भाजप तिथे राष्ट्रवादीसोबत आघाडी करू शकतो. या कारखान्याचा अध्यक्ष भाजप ठरवेल, असे पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सत्तेत जाऊन दादा दबावगट म्हणूनही कारखान्यावर नियंत्रण ठेवू शकतात.

Web Title: 'Bidri' in Dada, Mushrif, K. P. The bandage is possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.