बिद्री साखर कारखान्यासाठी दुपारीपर्यंत १६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:45 PM2017-10-08T13:45:54+5:302017-10-08T13:50:37+5:30
क़ोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्यासाठी आज (रविवार) सकाळ पासून संथ गतीने मतदान सुरू आहे. दुपारी साडेबारा पर्यंत केवळ १६ टक्के मतदान झाले आहे.
मुरगुड, 8 : क़ोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्यासाठी मतदान आज (रविवार) सकाळ पासून संथ गतीने सुरू आहे. दुपारी साडेबारा पर्यंत केवळ १६ टक्के मतदान झाले आहे.
बिद्री कार्यक्षेत्रातील कागल, राधानगरी, भुदरगड आणि करवीर या तालुक्यातील २२३ गावात १८७ मतदान केंद्रे आहेत. यातील सरवडे (ता.राधानगरी) या मतदान केंद्रावर गैरसमजातून दोन गटात वादावादी झाली. मुरगुड या संवेदनशील केंद्रावर अत्यंत शांततेत मतदान सुरु आहे.
पालकमंत्री आणि महसूलमंत्री आ. चंद्रकांतदादा पाटील, आ. हसन मुश्रीफ, माजी चेअरमन के. पी. पाटील यांच्याविरुद्ध आ. प्रकाश आबिटकर, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे.
या निवडणुकीच्या निकालातून आगामी विधानसभा आणि लोकसभेचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या सर्वच नेत्यांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सुमारे ५५ हजार सभासद आज मतदानाचा हक्क बजाविणार असून त्यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
मागील आठ दिवसांपासून दिग्गज नेत्यांनी जाहीर सभा घेत कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यात प्रचाराचे रान उठवले होते. आज या सर्वच नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.