Kolhapur: ‘बिद्री’च्या राजकारणात ‘ए. वाय.’ना बेदखलची व्यूहरचना, सत्तारूढ गटांतर्गत खलबते
By राजाराम लोंढे | Published: November 7, 2023 03:32 PM2023-11-07T15:32:49+5:302023-11-07T15:34:02+5:30
अध्यक्षपदासह राधानगरीतील जागांवरून पेच
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना बेदखल करून पॅनेलची बांधणी करण्याचे सत्तारूढ गटांतर्गत खलबते सुरू आहेत. अध्यक्षपदासह राधानगरी तालुक्यातील सर्व गटातील उमेदवार निवडीवर पाटील यांनी दावा केल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
‘बिद्री’ कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्तारूढ व विरोधी आघाडीने पॅनेल बांधणीसाठी चाचपणी सुरू केली असून आघाडीच्या राजकारणात कोणत्या गटात कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंदाज घेतला जात आहे. सत्तारूढ आघाडीने मागील निवडणुकीतील मित्रपक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. पण, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ए. वाय. पाटील यांनी दबावाचे राजकारण सुरू केले आहे. मागील पाच वर्षात नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही.
आता ‘बिद्री’चे अध्यक्षपद व राधानगरी तालुक्यातील सर्व जागांवर आपण उमेदवार देणार अशी अट घातली आहे. पाटील यांच्या प्रस्तावाचे सत्तारूढ गटात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. पाटील यांच्या दबावाला झुकू नका, त्यांना घ्यायचा तो निर्णय घेऊ देत, असा दबाव कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केला आहे.
रविवारी रात्री, के. पी. पाटील यांच्या घरी काही निवडक प्रमुखांची बैठक होऊन, ए. वाय. पाटील यांच्या भूमिकेवर चर्चा झाली. ते सोडून गेले तर काय परिणाम होऊ शकतो? याचा अंदाजही घेण्यात आल्याचे समजते.
हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार
‘राधानगरी’च्या राजकारणात माजी आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यातील वाद नवा नाही. मात्र, प्रत्येक वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करत दोघांना एकत्र ठेवण्यात यश मिळवले. आता ‘ए. वाय.’ना सत्तारूढ आघाडीतून बाहेर काढण्याची व्यूहरचना असली तरी त्याला मंत्री मुश्रीफ पाठबळ देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिवाळीनंतर पॅनेलची अंतिम बांधणी
या आठवड्यात सत्तारूढ व विरोधी आघाडीमध्ये उमेदवारीवरून चाचपणी होणार आहे. दिवाळीनंतर कोणत्या गटाला किती जागा, यावर चर्चा होऊन पॅनेलची घोषणा होणार आहे.
१७ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत
‘बिद्री’साठी १७ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. ३ डिसेंबरला मतदान तर ५ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.