‘बिद्री’ची ऊसतोडणी यंत्रणा सुरळीत होणार --अरुण काकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 08:54 PM2017-09-28T20:54:51+5:302017-09-28T20:57:33+5:30
सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या तोडणी कार्यक्रमात सुसूत्रता यावी, यासाठी टाटा कन्सलटन्सी कंपनीद्वारे ‘एम-कृषी’ अॅपद्वारे ऊस उत्पादकांना लागण व तोडणीची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या तोडणी कार्यक्रमात सुसूत्रता यावी, यासाठी टाटा कन्सलटन्सी कंपनीद्वारे ‘एम-कृषी’ अॅपद्वारे ऊस उत्पादकांना लागण व तोडणीची वेळ, ऊस बिल, कपाती आणि ऊस पिकाबाबत सभासदाच्या प्रश्नांना तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्र्गदर्शन केले जाणार आहे. या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीमुळे बिद्रीचा ऊस तोडणी कार्यक्रम निश्चितच सुरळीत होईल, असा आत्मविश्वास कारखान्याचे प्रशासकीय अध्यक्ष अरुण काकडे यांनी व्यक्त केला.
बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.
बिद्रीच्या इतिहासात सभा अगदी शांततेत दोन तास सभा चालली. आज बिद्री कारखान्याच्या निवडणुकीची अर्जांची माघार, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे सभेकडे अनेक सभासदांनी पाठ फिरवली.
काकडे म्हणाले, बिद्री साखर कारखाना ऊस दरात अग्रेसर आहे. कारखान्याची आर्थिक स्थितीही भक्कम आहे. मात्र तोडणी कार्यक्रमात मानवी हस्तक्षेप वाढत असल्याने तो विस्कळीत होतो. त्यामुळे ऊस लागण बिनचूक नोंद व्हावी व तोडणी व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानानुसार टाटा कन्सल्टींग सर्व्हिस पुणे यांच्यामार्फत लागण, तोडणी ऊस उत्पादकाच्या मोबाईलवर कळविण्यात येणार आहे तर अँड्रॉईड मोबाईलवरती अॅपद्वारेही माहिती मिळणार आहे. बिद्रीचा उतारा हा १२.५९ असल्याने पुढील वर्षी एफआरपी दर अंदाजे २८६९ रुपये इतका राहणार आहे. कारखान्याने गाळप केलेल्या ४ लाख ५१ हजार मेट्रीक टन ऊसाचे प्रति टन ३००१ दराने १३५ कोटी रुपये ऊस पुरवठा करणाºया उत्पादकास अदा केले आहे.
कार्यक्षेत्रात ११ लाख टन ऊस उपलब्ध आहे. मात्र कारखान्याची गाळप क्षमता ही ४५०० मेट्रीक टन असून उत्पादकाचा ऊस वेळेत गाळप होत नाही. त्यामुळे अन्य कारखान्यांना ऊस पाठविला जातो. तर बाहेरील कारखाने ही ऊसाची पळवापळवी करतात. या कारणास्तव कारखान्याची गाळप क्षमता ७५०० मे. टन वाढवण्यासाठी व त्यातून मिळणारे बगॅस हा विजनिर्मितीसाठी मिळणार आहे.
त्याअनुषंगाने नवीन बॉयलर टर्बाइन व अनुषांगिक मशिनरी बसविणेसाठी यापूर्वी सभेने मंजुरी दिली आहे. वाढीव गाळप क्षमतेच्या मंजूर प्रस्तावाचा अंतिम टप्प्यात असून केंद्राकडे सादर केलेला आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याला पिकवलेला सर्वच्या सर्व पाठवून कारखाना अधिक सक्षम करण्साठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
काही सभासदांनी उत्तम कारभाराबद्दल प्रशंसा करत प्रशासकीय अध्यक्ष अरुण काकडे, सदस्य अजय ससाणे, प्रदीप मालगावे, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रशासकीय सदस्य विठ्ठलराव खोराटे, नाथाजी पाटील, उपस्थित होते.
अजय ससाणे यांनी स्वागत केले, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांनी अहवालवाचन केले. एस.जी. किल्लेदार यांनी प्रोसेडींग वाचन केले. आभार नाथाजी पाटील यांनी मानले.
सहवीज प्रकल्पाचे १३ कोटी ६४ लाख देय
सहवीज प्रकल्प उभारणीसाठी एमएसी बँकेकडून रुपये ५९ कोटी ७० लाख तर केंद्रशासनाच्या एसडीएफ फंडातून चार टक्के व्याजाने आठ वर्षे मुदतीसाठी ३६ कोटी ७८ लाख असे मिळून ९८ कोटी ४८ लाख रुपये तर कारखान्याने स्वनिधीतून २७ कोटी ७० लाख घातले असून आतापर्यंत एमएसी बँकेचे साठ कोटी कर्ज व व्याज १३ कोटी ९६ लाख तर केंद्र शासनाचे ३८ कोटी ७० लाख कर्जाच्या हप्त्याचे व व्याजापोटी आज अखेर २५ कोटी १३ लाख परतफेड केली असून १३ कोटी ६४ लाख देय शिल्लक आहे.ती पुढील दोन वर्षात अदा करावयाची आहे.