शेतकऱ्यांची दिवाळी गोड, 'बिद्री' देणार ऊसाला एकरक्कमी ३०५६ रुपये दर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:53 PM2021-10-20T17:53:16+5:302021-10-20T18:03:57+5:30
अध्यक्ष के. पी. पाटील यांची घोषणा : जिल्ह्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना
दत्ता लोकरे
सरवडे : कोल्हापूरच्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ शनिवार ६ नोव्हेंबरलार केला जाणार असून गळीताला येणाऱ्या प्रतिटन ऊसाला एफआरपी नुसार ३०५६ रुपये दर एकरक्कमी दिला जाईल. हा दर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीत सर्वाधिक आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
पाटील म्हणाले, बिद्री साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या गतगळीत हंगामात ६ लाख ८० हजार ४२७ मे. टन ऊसाचे गाळप करुन ८ लाख ६५ हजार ६०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १२.७२ टक्के मिळाला आहे. त्यानुसार कारखान्याची एफआरपी ३०५५.१७ रुपये इतकी होते. मात्र, कारखान्याने ही रक्कम ३०५६ रुपये इतकी देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने कायमपणे एकरक्कमी एफआरपी दिली असून इतर कारखान्यांच्या तुलनेत नेहमीच १०० ते १५० रुपये जास्त राहिली आहे. यंदाही ही प्रथा कायम राखली जाईल.
पुढे बोलताना ते म्हणाले, येत्या हंगामासाठी १३ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली असून यामधून कारखान्यास १० लाख मे. टन ऊसाची उपलब्धता होईल. वाढीव विस्तारीकरणामुळे कार्यक्षेत्रातील सर्व ऊस लवकरात लवकर गाळप करण्याचा मानस असून ऊस उत्पादकांनी सर्व ऊस कारखान्यास पाठवून जिल्ह्यातील सर्वाधिक दराचा लाभ घ्यावा. यावेळी संचालक गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदुम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रविण भोसले, मधुकर देसाई, के.ना.पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील, जगदीश पाटील, सुनिलराज सुर्यवंशी, विकास पाटील व अधिकारी उपस्थित होते. स्वागत व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांनी केले. आभार कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी मानले.