तगडचा बूथ होणार गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:59 AM2019-04-22T00:59:11+5:302019-04-22T00:59:16+5:30
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : या लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर तयार बूथचा वापर ...
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : या लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर तयार बूथचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने स्थानिक पातळीवर तयार केले जाणारे तगडी बूथ गायब होणार आहेत. जिल्ह्यात ४२८५ तयार बूथ प्राप्त झाले असून, त्याचे केंद्रनिहाय वाटपही झाले आहे. राज्याचे नावापासून मतदान केंद्रांच्या क्रमांकापर्यंतची सर्व माहिती या बूथवर असणार आहे.
जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी (दि. २३) मतदान होत आहे. यावेळी मतदान केंद्रांमध्ये तगडी बूथऐवजी थेट आयोगानेच पाठविलेल्या तयार बूथचा वापर केला जाणार आहे. यामध्ये ‘कोल्हापूर’साठी २२३६ व ‘हातकणंगले’साठी १९४९ तयार बूथ प्राप्त झाले आहेत. त्यांचे विधानसभानिहाय संंबंधित साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जिल्हा साहित्य वाटप प्रमुखांकडून वाटपही झाले आहेत. या बूथचे वेगळेपण म्हणजे त्यावर भारत निवडणूक आयोगाचे नाव आहे. त्याचबरोबर राज्याचे नाव, मतदानाचा दिनांक, मतदान केंद्राचे नाव, मतदान केंद्र क्रमांक अशी माहिती दर्शविण्यात आली आहे. किमान दहा वर्षे टिकतील अशा पद्धतीने हे बूथ तयार करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यापूर्वी स्थानिक पातळीवर कागदी तगडाचा वापर करून हे बूथ तयार केले जायचे; परंतु आता या नव्या तयार बूथमुळे नेहमीचे तगडी बूथ या निवडणुकीतून गायब होणार आहेत. या निवडणुकीत ‘कोल्हापूर’मतदारसंघात एक इव्हीएम व ‘हातकणंगले’मध्ये दोन ईव्हीएमचा वापर होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत दोन प्रकारे हे बूथ देण्यात आले आहेत. यामध्ये हातकणंगलेत दोन ईव्हीएम असल्याने येथील बूथची साईज थोडी लांब राहणार आहे. अतिशय चांगल्या व आकर्षक पद्धतीची रचना असलेले हे तयार बूथ मतदारांना या निवडणुकीत प्रथमच दिसणार आहेत. ते किमान दहा वर्षे टिकतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
विधानसभा क्षेत्र तयार बूथ
चंदगड ३९४
राधानगरी ४४४
कागल ३६८
कोल्हापूर दक्षिण ३३८
करवीर ३६८
कोल्हापूर उत्तर ३२४
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
विधानसभा क्षेत्र तयार बूथ
शाहूवाडी ३४९
हातकणंगले ३४७
इचलकरंजी २८०
शिरोळ ३१६
शिराळा ३५१
इस्लामपूर ३०७