सामाजिक उपक्रमांनी बिग बीचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 03:51 PM2020-10-12T15:51:05+5:302020-10-12T15:55:01+5:30
amitabhbacchan, birthday, kolhapurnews करोडो प्रेक्षकांचे आवडते अभिनेता अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कोल्हापूर : करोडो प्रेक्षकांचे आवडते अभिनेता अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दिवसभर शहरातील बच्चनप्रेमींनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
उजळाईवाडी येथील चित्रकार शकील नदाफ यांनी पोर्ट्रेटच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांची प्रतिमा गहू, तांदूळ, उडीदडाळ यांच्या साहाय्याने साकारली. हे पाहण्यासाठी दिवसभर बच्चनप्रेमींनी गर्दी केली होती.
यावेळी अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड यांच्या वतीने अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आदिल फरास यांच्या पुढाकारातून अंबाबाई मंदिराच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
बच्चन साहेब फॅन्स ग्रुपच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बच्चन यांना उदंड आयुष्य लाभावे अशी प्रार्थना केली. दोन वर्षांसाठी पाच गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दोन गरीब कुटुंबांना एक वर्षासाठी दरमहा ६०० रुपये देण्याचा निश्चय केला. सायंकाळी बच्चन यांच्या चित्रपटातील गाण्यांवर कराओके ट्रॅकवर गाणी गाईली गेली. तसेच केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.
कोरोना योद्ध्यांचा सत्कार
अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड, कोल्हापूर व एबीइएफ टीम यांच्या वतीने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मृतदेहांवर जातपात न पाहता अंत्यसंस्कार करणारी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल समिती तसेच लॉकडाऊनच्या दरम्यान भटक्या जनावरांना व निराधार लोकांना खाऊ घालणाऱ्या कोल्हापूर वुई केअर या संस्थांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइडचे सदस्य किरण शहा यांनी एन ९५ मास्कचे वाटप केले. तसेच ग्रुप मेंबर सरिता राजेभोसले यांच्या वतीने दोन्ही सामाजिक संस्थांना मानचिन्हे देण्यात आली. यावेळी ग्रुपचे प्रमुख अॅड. इंद्रजित चव्हाण, सूर्यकांत पाटील बुधिहाळकर, बैतुलमाल समितीचे जाफरबाबा, नगरसेवक तौफिक मुलाणी तसेच कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड उपस्थित होते.