ऊसतोड मजुरांना आणण्याचे मोठे आव्हान; साखर कारखान्यांना द्यावी लागेल सुरक्षेची हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:18 AM2020-09-07T02:18:51+5:302020-09-07T06:43:20+5:30
कोरोनाची भीती
- चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : कोरोना हटण्याचे नाव घेत नसल्याने नवा गळीत हंगाम सुरळीत सुरू होणार का? कोरोनाला न घाबरता ऊसतोड मजूर पुरेसे येणार का?, अशा प्रश्नांनी साखर कारखानदारही चिंतीत आहेत. ऊसतोड मजुरांना आणणे हे कारखान्यांसमोरचे आव्हान ठरणार आहे.
राज्यात यंदा सुमारे ९०० लाख टन ऊस गळितासाठी उपलब्ध असेल. सहकारी आणि खासगी क्षेत्रातील सुमारे १८० साखर कारखाने गळीत हंगाम घेतील, असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. बहुतांश ऊसतोड मजूर हे मराठवाड्यातील असतात. चालू गळीत हंगामासाठी ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांच्या मुकादमांनी साखर कारखान्यांशी नेहमीप्रमाणे करार करून अॅडव्हान्सही उचललेला आहे. मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मजूर यंदा बाहेर पडण्याची शक्यता कमी असल्याची चिन्हे आहेत.
राज्यात दहा लाख ऊसतोड मजूर
राज्यात सुमारे दहा लाख ऊसतोड मजूर गळीत हंगामात लागतात. बीड, जालना, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्ह्यांतून ऊसतोडीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या सर्वाधिक आहे. एकट्या बीड जिल्ह्यातच ही संख्या पाच लाख असल्याचे माजी आमदार केशवराव आंधळे यांनी सांगितले.