राष्ट्रीय काँग्रेसपुढे गड कायम राखण्याचे मोठे आव्हान

By admin | Published: February 4, 2017 08:59 PM2017-02-04T20:59:58+5:302017-02-04T20:59:58+5:30

आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का : शिवसेना-भाजपात छुपी युती होण्याची चिन्हे

The big challenge for the Congress to retain the legacy ahead of the National Congress | राष्ट्रीय काँग्रेसपुढे गड कायम राखण्याचे मोठे आव्हान

राष्ट्रीय काँग्रेसपुढे गड कायम राखण्याचे मोठे आव्हान

Next

दिनेश साटम -- शिरगाव --जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले आहेत, तसतसे प्रत्येक मतदारसंघातील वातावरण थंडीच्या गारव्यातही तापू लागले आहे. देवगड तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघही त्याला अपवाद नाही. हा जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव असून, यातील शिरगाव पंचायत समिती हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने खऱ्या अर्थाने महिलाराज येणार आहे.
तळवडे पंचायत समिती हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या तिन्ही जागांवर आरक्षणाचा प्रस्थापितांना फटका बसला असून, २०१७ च्या निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळणार असे मनसुबे बाळगणाऱ्यांचा काहीसा हिरमोड झाला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे २०१२ सालच्या निवडणुकीत या तिन्ही जागांवर असलेले प्राबल्य मोडीत काढण्यासाठी शिवसेना-भाजप छुपी युती करून तिन्ही जागांवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र
आहे.
संदेश पारकर यांचा राष्ट्रीय काँग्रेसमधून, तर अतुल रावराणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे बदलाचे वारे या मतदारसंघातही जाणवू लागले आहेत. शिवसेनेनेही देवगड तालुक्याच्या तालुकाप्रमुखपदाची धुरा शिरगाव येथील मिलिंद साटम यांच्याकडे सोपविल्यामुळे शिवसैनिकांत नवचैतन्य पसरले असून, शिवसेनेनेही उभारी घेतली आहे.
शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून २०१२ च्या निवडणुकीत कुवळे-रेंबवली गावचे माजी सरपंच सुभाष नार्वेकर हे विजयी झाले. त्यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपदही भूषविले आहे, तर शिरगाव पंचायत समिती मतदारसंघातून देवगड पंचायत समितीचे विद्यमान सभापती रवींद्र जोगल विजयी झाले. तळवडे मतदारसंघातून माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य सदानंद ऊर्फ नंदू देसाई हे विजयी झाले.
शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिरगाव व तळवडे अशा दोन पंचायत समितीच्या मतदारसंघात ११ ग्रामपंचायती येतात. यापैकी ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रीय काँग्रेस, ३ ग्रामपंचायतींवर ग्रामविकास आघाडी, तर एका ग्रामपंचायतीवर शिवसेना सत्तास्थानी आहे.
शिरगाव पं.स.मध्ये शिरगाव, शेवरे, साळशी, सांडवे, चाफेड व हडपीड या गावांचा समावेश आहे, तर तळवडे पं.स.मध्ये-तळवडे, तळेबाजार, बागतळवडे, चांदोशी, आरे, वळीवंडे, तोरसोळे, कुवळे, रेंबवली या गावांचा समावेश आहे. शिरगाव जि.प. मतदारसंघातून १९९२ मध्ये सुगंधा साटम, १९९७ मध्ये शरद मिराशी, २००२ मध्ये मनीषा चिंदरकर, २००७ मध्ये रवींद्र जोगल व २०१२ मध्ये सुभाष नार्वेकर यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
यापैकी सुगंधा साटम यांनी काही कालावधीसाठी महिला व बालकल्याणचे सभापतिपद, शरद मिराशी यांनी वित्त आणि बांधकाम सभापतिपद, तर सुभाष नार्वेकर यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद भूषविले आहे.
शिरगाव पं.स.मधून यापूर्वी सुरेश कदम, सुनील गावकर, अनिता आजगावकर, अमित साळगावकर, रवींद्र जोगल यांनी प्रतिनिधित्व केले. यापैकी अनिता साळगावकर व रवींद्र जोगल यांनी सभापतिपद, तर अमित साळगावकर यांंनी उपसभापतिपद भूषविले आहे.
तळवडे मतदारसंघातून अंकुश नाईक, भिकाजी (काका) जेठे, रेश्मा सावंत, विद्या कुबडे, सदानंद देसाई यांनी प्रतिनिधित्व केले आहे. यापैकी रेश्मा सावंत व सदानंद देसाई यांनी पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले आहे.
दरम्यान, संदेश पारकर यांच्या भाजप प्रवेशानंतर माजी उपसभापती अमित साळगावकर, राजेश कदम, राजेंद्र तावडे यांनी भाजपात प्रवेश केला, तर चाफेड गावातील गावठण, घाडीवाडी, राणेवाडी, मोंडकरवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीप्रश्नासाठी खासदारांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. शिरगाव बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.


काँग्रेस, भाजपची उमेदवारी जाहीर
शिरगाव जिल्हा परिषदमधून राष्ट्रीय काँग्रेसकडून साळशी गावच्या विद्यमान सरपंच विशाखा प्रभाकर साळसकर, तर भाजपकडून मानसी शैलेंद्र जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिरगाव पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेसकडून संज्योती सचिन देसाई, तर शिवसेनेकडून शिरगाव-शेवरे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अपूर्वा तावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तळवडे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपकडून नारायण जाधव यांना उमेदवारी जाहीर केली, तर राष्ट्रीय काँग्रेसमधून चंदू वळंजू व अजित कांबळे यांची नावे चर्चेत आहेत.
शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत ‘सेटिंग’
शिरगाव जिल्हा परिषद व तळवडे पंचायत समिती भाजपकडे, तर शिरगाव पंचायत समिती शिवसेनेकडे असे युतीचे जागावाटप झाले होते, परंतु मुंबईत शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे जिल्ह्यातही युती होणार नाही, असे शिवसेना जिल्हाप्रमुखांनी जाहीर केले असले तरी शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात ज्याठिकाणी भाजपचे उमेदवार जाहीर झाले, त्याठिकाणी शिवसेना उमेदवार उभे करणार नाही, तर शिवसेनेच्या जाहीर झालेल्या शिरगाव पंचायत समितीच्या जागेवर भाजप उमेदवार देणार नाही. काहीही करून या मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी या दोन्ही पक्षांकडून व्यूहरचना आखली जात आहे. यात काँग्रेसला या मतदारसंघात आपला गड कायम राखण्याचे आव्हान आहे, तर शिवसेना व भाजपला या मतदारसंघात काँग्रेसला नामोहरण करून अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडावे लागणार आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
देवगड पंचायत समितीचे सभापती रवींद्र जोगल, माजी सभापती सदानंद देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा सुगंधा साटम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी साटम यांची काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, तर शिवसेनेच्यावतीने नवनियुक्त तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विश्राम (मंगेश) लोके, माजी सरपंच राजेंद्र शेट्ये, खरेदी-विक्री संघाचे संचालक संतोष फाटक, शैलेंद्र जाधव यांनाही उमेदवारांच्या विजयासाठी लढावे लागणार आहे.

मतदार संघाचा
लेखाजोखा

शिरगाव

Web Title: The big challenge for the Congress to retain the legacy ahead of the National Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.