इचलकरंजीत कर आकारणीचे मोठे आव्हान

By admin | Published: January 3, 2017 11:31 PM2017-01-03T23:31:40+5:302017-01-03T23:31:40+5:30

निवडणूक, नोटाबंदी, आर्थिक मंदीचा परिणाम : ४० कोटी रुपये वसुलीसाठी कर विभागाची तारेवरची कसरत

The big challenge for Ichalkaranji tax levy | इचलकरंजीत कर आकारणीचे मोठे आव्हान

इचलकरंजीत कर आकारणीचे मोठे आव्हान

Next

इचलकरंजी : नगरपालिका निवडणुकीमुळे चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या नोटिसा देण्यास झालेला उशीर आणि नोटाबंदी यामुळे इचलकरंजी नगरपालिकेसमोर घरफाळा वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सुमारे ४० कोटी रुपयांच्या वसुलीपोटी अद्यापपर्यंत अकरा कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, येथील वस्त्रोद्योगात असलेली कमालीची आर्थिक मंदी पाहता मार्च महिन्यात ९० टक्के वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी पालिकेच्या कर वसुली विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सन २०१६ मध्ये नियमितपणे होणारी चतुर्थ वार्षिक कर आकारणीची प्रक्रिया सुरू असतानाच नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले. मे महिन्यापासून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी नगरपालिकेकडील यंत्रणा कामाला लागली. इकडे मात्र कर विभागाकडे चतुर्थ कर आकारणीसंदर्भात सुरू असलेले संपूर्ण कामकाज ठप्प झाले. म्हणून जुन्या घरफाळ्याप्रमाणेच मालमत्ताधारकांना नोटिसा देण्यात आल्या. त्याप्रमाणे वसुलीस सुद्धा सुरूवात करण्यात आली. पण सप्टेंबर महिनाअखेर फारशी वसुली झाली नव्हती.
अशा पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असताना ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द झाल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, शासकीय देणी भागविण्यासाठी नोटा चालू शकतील, असेही सरकारने जाहीर केले. नगरपालिकेकडे असलेल्या घरफाळा व पाणीपट्टी वसुली विभागाने स्वतंत्र वसुली कक्ष उघडला. मालमत्ताधारकांनी घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासाठी नगरपालिकेतील या कक्षाकडे गर्दी केली. कर वसुलीसाठी चलनी नोटा चालू असेपर्यंत नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये सुमारे अकरा कोटी रुपये जमा झाले.
मागील आठवड्यापासून ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा न घेण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. परिणामी करवसुली विभागाकडे आता मालमत्ताधारकांनी कर भरण्यासाठी पाठ फिरवली आहे. अशातच चतुर्थ वार्षिक कर आकारणीने वाढीव घरफाळा झालेल्या फरकाच्या नोटिसा नगरपालिकेने मालमत्ताधारकांना देण्यास सुरूवात केली आहे. पूर्वी नगरपालिकेकडे असणारी निव्वळ घरफाळ्याची वार्षिक मागणी
१४.१२ कोटी रुपये होती. ती
आता वाढीव घरफाळ्यामुळे १९.९१ कोटी रुपये इतकी झाली आहे. याशिवाय पाणीपट्टीचे १०.६४ कोटी रुपये एकूण येणे आहे. अशा प्रकारे ३०.५५ कोटी रुपये इतकी घरफाळा व पाणीपट्टीची कर आकारणी वसुली करण्याचे उद्दिष्ट नगरपालिकेसमोर आहे. याशिवाय विनापरवाना बांधकामाची शास्ती दहा कोटी रुपये येणे बाकी असून, घरफाळा व पाणीपट्टीचे अंतिम उद्दिष्ट सुमारे ४० कोटी रुपयांचे आहे.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून एकूण वस्त्रोद्योगात मंदीचे वातावरण आहे. सहा महिन्यांपासून तर वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदी कमालीची गडद झाली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच मालमत्ताधारकांना चलन टंचाई सतावत आहे. त्यातच नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलन टंचाईची भर पडली आहे. म्हणून अशा स्थितीत नगरपालिकेसमोर घरफाळा व पाणीपट्टीच्या एकूण येणे रकमेपोटी ९० टक्क्यांचे उद्दिष्ट साध्य करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे पालिकेच्या कर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर वसुलीचे एक आव्हान निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)


नवीन घरफाळ्याच्या चालू महिन्यात अंतिम नोटिसा
नवीन चतुर्थ कर आकारणीमुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात ५ कोटी ७९ लाख रुपयांची भर पडणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये मालमत्ताधारकांना घरफाळा फरकाच्या प्राथमिक नोटिसा देण्यात आल्या आहेत. आता जानेवारी महिनाअखेर अंतिम नोटिसा दिल्या जातील.
त्यानंतर मात्र फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांमध्ये ९० टक्के उद्दिष्ट नगरपालिकेच्या कर विभागाला पूर्ण करावे लागेल, अशी माहिती पालिकेचे प्रभारी कर अधिकारी जानबा कांबळे यांनी दिली. नवीन कर आकारणीनुसार १९.९१ कोटी रुपये संयुक्त कर आकारणीची रक्कम आहे.
तर १०.६४ कोटी रुपये पाणीपट्टी आणि जुनी थकबाकी १४.१२ कोटी रुपये इतकी आहे. त्यामध्ये विनापरवाना बांधकामाची शास्ती दहा कोटी रुपये असल्याचेही कांबळे यांनी स्पष्ट केले.


३०.५५ कोटी रुपये इतकी घरफाळा व पाणीपट्टीची कर आकारणी वसुली करण्याचे उद्दिष्ट.

Web Title: The big challenge for Ichalkaranji tax levy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.