एसटी बँक: कोट्यवधींच्या ठेवी परत मिळविण्याचे मोठे आव्हान, संचालकांच्या नव्या निर्णयांकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 01:57 PM2024-03-16T13:57:53+5:302024-03-16T13:58:05+5:30
सचिन यादव कोल्हापूर : एसटी बँकेतील ४८० कोटी रुपयांच्या गेलेल्या ठेवी परत मिळविण्याचे मोठे आव्हान संचालकांच्या पुढे आहे. कारण ...
सचिन यादव
कोल्हापूर : एसटी बँकेतील ४८० कोटी रुपयांच्या गेलेल्या ठेवी परत मिळविण्याचे मोठे आव्हान संचालकांच्या पुढे आहे. कारण ठेवी मिळाल्याशिवाय पुरेसा व्यवसाय होणार नाही. व्यवसाय नसेल तर बँक सुस्थितीत राहणार आहे. त्यामुळे ठेवी जाण्याने आर्थिक दुष्टचक्र सुरू झाले आहे. नव्याने सुरू केलेल्या ‘विशेष उत्सव योजने’तून किती ठेवी जमा होतील, याचा अंदाज अद्याप संचालकांना नाही. येत्या एप्रिल, मे, जून महिन्यात निवृत्त होणाऱ्या सभासदांकडून प्रॉव्हिटंड फंड, ग्रॅच्युइटीची सुमारे १५० कोटी रुपयांची रक्कम मिळण्याचा आशावाद संचालकांना आहे.
स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची (एस.टी. बँक) स्थापना १९५३ मध्ये झाली. आशिया खंडात सर्वात मोठी असलेल्या या बँकेची आर्थिक स्थिती बिघडत चालल्याने ठेवी आणि कर्ज वाटपाचे गणित बिघडले आहे. राज्यभरातील संचालकांची दर पंधरा दिवसांनी या विषयावर चर्चा होत आहे. त्यासाठी विशेष उत्सव योजनेतून ५९ कोटी ३६ लाख रुपये जमा झाले आहेत. एका लाखाला ८.७५ टक्के व्याज दराची योजना आणली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यात बँकेची आर्थिक स्थिती पूर्ववत होईल, असा विश्वास राज्यातील संचालकांना आहे. सध्या कर्ज मिळत नसल्याने सभासद हवालदिल आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील बँकेच्या शाखेत गेल्या चार महिन्यात ४ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
नोकरभरतीचे दुखणे
एसटी बँकेतील नोकरभरती संदर्भात एसटी संघटना आणि बँक संचालकात धुसफूस सुरू आहे.
आजी, माजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मुले, रोजंदारी कर्मचारी, काही खासगी उमेदवारांची नेमणूक राज्यातील शाखेत आहे.
५० शाखांत एकूण ४१० कर्मचाऱ्यांची मागणी
राज्यातील ५० शाखेत कामकाजासाठी एकूण ७०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. सध्या २९० कर्मचारी कार्यरत असून अजून ४१० कर्मचारी लागणार आहेत. अत्याधुनिक सुविधाही बँकेत नाहीत.
ठेवी परत मिळवू : घाटगे
बँकेतून गेलेल्या ठेवी पूर्ववत करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर कर्ज वाटप सुरू होईल. कोल्हापूर आणि गडहिंग्लज शाखेतही कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा होत आहेत. - संजय घाटगे, संचालक एसटी बँक
- कोल्हापूर, गडहिंग्लज आर्थिक स्थिती
- कर्जे : ९५ कोटी ९३ लाख रुपये
- ठेवी : ७९ कोटी ६८ लाख रुपये
राज्यातील स्थिती
- एकूण ठेवी २२०० कोटी
- ठेवी काढल्या ४८० कोटी
- कर्ज १७०० कोटी
- ओव्हरड्राफ्ट ४०० कोटी
- मध्यम मुदतीचे कर्ज ९५० कोटी
कर्ज वाटप बंद
घरबांधणीचे ३० लाख, चारचाकी कर्ज, गृहोपयोगी कर्जाचे वाटप बंद आहे.