कोबी, टोमॅटो, भेंडीच्या दरात मोठी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:41+5:302021-06-10T04:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : या आठवड्यात कोबी, टोमॅटो व भेंडीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आवक वाढल्याने घाऊक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : या आठवड्यात कोबी, टोमॅटो व भेंडीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आवक वाढल्याने घाऊक बाजारात प्रतिकिलो ५ ते १० रुपये झाला आहे. त्याशिवाय ओली मिरची, ढब्बूच्या दरातही काहीसी घट झाली आहे. आवक वाढली, मात्र उठाव नसल्याने दरावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
खरीप पेरणीमुळे स्थानिक भाजीपाला कमी होत असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून भाजीपाल्याच्या दरात वाढ होत जाते. जुलै, ऑगस्ट महिन्यात हा दर चांगलाच कडाडतो. मात्र, यंदा जूनमध्ये भाजीपाल्याच्या दरात काहीसी घसरण दिसत आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, लग्नसमारंभ नसल्याने विक्रीवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र कोबी, टोमॅटो व भेंडी या प्रमुख भाज्यांच्या दरात या आठवड्यात चांगलीच घसरण झाली आहे. घाऊक बाजारात कोबी ५ रुपये किलो, तर टोमॅटो ४, ओली मिरची १०, भेंडी ५ व ढब्बू १५ रुपये किलो राहिला आहे.
आवक थोडी वाढली आणि उठाव नसल्याने दरात घट दिसत आहे. इतर भाज्यांच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही.
वांगी तेजीत
इतर भाज्यांच्या दरात घसरण होत असली तरी वांग्याचे दर मात्र चढेच आहेत. घाऊक बाजारात ५० रुपये किलो दर असून, किरकोळ बाजारात तो ८० रुपयांपर्यंत आहे.
कोथिंबीर घसरली, तर मेथी वधारली
कोल्हापूर बाजार समितीत कोथिंबीरची रोज आवक ५८ हजार पेंढ्यांची होते. त्या प्रमाणात उठाव नसल्याने घाऊक बाजारात ५ रुपये पेंढी आहे. या उलट मध्यंतरीच्या जोरदार पावसाने मेथीला फटका बसल्याने एकदमच कडाडली आहे. घाऊक बाजारात २० रुपये तर किरकोळमध्ये २५ रुपये पेंढीचा दर आहे.