सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, विकण्याची घाई कशाला?; शेतकऱ्यांना तारण योजनेचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 06:17 PM2022-11-28T18:17:54+5:302022-11-28T18:18:18+5:30

..तर शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो.

Big fall in soybean prices, Aadhaar for farmers taran scheme | सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, विकण्याची घाई कशाला?; शेतकऱ्यांना तारण योजनेचा आधार

सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, विकण्याची घाई कशाला?; शेतकऱ्यांना तारण योजनेचा आधार

Next

राजाराम लोंढे

कोल्हापूर : गेल्या वर्षीपासून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. भाव पडल्याने सोयाबीन विकण्याची घाई करण्यापेक्षा शेतीमाल तारण योजनेतून कर्ज घेतले तर ते अधिक चांगले होऊ शकेल. मात्र या योजनेला जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

परतीच्या पावसाने यंदा खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आल्यानंतर पावसाने झोडपून काढल्याने हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली. त्यातून काढणी करून कसेबसे घरापर्यंत आणलेल्या शेतीमालाला दर मिळत नाही. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली असून, प्रतिक्विंटल ५७३० रुपये दर आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च व त्याला मिळणारा भाव याचा ताळमेळ बसत नसल्याने काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

घरी ठेवले तर बँकेच्या कर्जाचे काय करायचे? त्यातून आगामी काळात दर वाढले तर ठीक नाहीतर यापेक्षा कमी झाले तर काय? या प्रश्नांच्या गर्तेत शेतकरी अडकला आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या शेतीमाल तारण योजनेचा लाभ घेणे शेतकऱ्यांना परवडणारे आहे.

काय आहे शेतमाल तारण योजना?

खरीप किवा रब्बी हंगामा नंतर शेतीमाल एकदमच बाजारात येत असल्याने दर कोसळतात. हा शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. शेतमालासाठी योग्य भाव मिळावा यासाठी कृषी पणन मंडळ १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे.

तारण कर्जास ६ टक्के व्याज

शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्वीकारला जातो. व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेंतर्गत स्वीकारला जात नाही. तारण कर्जाची मुदत सहा महिने असून तारण कर्जास व्याजाचा दर ६ टक्के आहे. समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यापर्यंत रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते.

बाजार समित्यांना ३ टक्के परतावा

शेतीमाल तारण योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असून सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याजाची सवलत दिली जाते.

या पिकांचा होतो योजनेत समावेश

या योजनेमध्ये तूर,मूग,उडीद,सोयाबीन,सुर्यफूल,चना,भात, करडई,ज्वारी,बाजरी,मका,गहू,काजू बी,बेदाणा व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यातील सोयाबीनचे भाव,प्रतिक्विंटल -
२१ नोव्हेंबर - ५८२५
२२ नोव्हेंबर - ५७४५
२३ नोव्हेंबर - ५७७५
२४ नोव्हेंबर - ५७७५
२५ नोव्हेंबर - ५७२५
२६ नोव्हेंबर - ५७२५

Web Title: Big fall in soybean prices, Aadhaar for farmers taran scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.