टेकडीवर जन्मलेल्या नटीने शेतीवर बोलायचे हा मोठा विनोद- राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 02:21 PM2020-09-23T14:21:57+5:302020-09-23T14:23:37+5:30
टेकडीवर जन्मलेल्या नटीने शेतीवर बोलायचे यापेक्षा मोठा विनोद कोणता, अशा शब्दांत शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिला फटकारले. शेतकऱ्यांवर बोलायला भाजपवाल्यांना दुसरे कोणी सर्वज्ञ मिळाले नाही का, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोल्हापूर : टेकडीवर जन्मलेल्या नटीने शेतीवर बोलायचे यापेक्षा मोठा विनोद कोणता, अशा शब्दांत शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिला फटकारले. शेतकऱ्यांवर बोलायला भाजपवाल्यांना दुसरे कोणी सर्वज्ञ मिळाले नाही का, असा टोलाही त्यांनी लगावला.
मोदी सरकारने बहुमताच्या बळावर मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी जागोजागी आंदोलन करत आहेत. या आंदोलनावरून कंगना रनौत हिने आंदोलन करणारे शेतकरी देशद्रोही आहेत, अशी मुक्ताफळे उधळली. यावरून शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांमध्येही संतापाची भावना आहे.
रताळे आणि मुळा यातला फरक तरी तिला कळतो का, अशी विचारणा करत शेट्टी यांनी निदान शेतीतले कळणाऱ्यांनी शेतीवर बोलावे, भाजपने याचा तरी विचार केला असता तर बरे झाले असते, असा चिमटा काढला. कंगना आपण अभिनेत्री आहे हे विसरून सर्वज्ञ असल्यासारखे बेताल वक्तव्ये करत आहे.
भाजपनेही या वक्तव्याचा इन्कार केलेला नाही म्हणजे तिच्याशी भाजप सहमत आहे, असाच अर्थ निघतो, मग तिला प्रवक्ती म्हणून का घोषित करत नाही, असा सवालही शेट्टी यांनी केला.