डोंगरांतील आगींमुळे जैव संपत्तीचे मोठे नुकसान

By admin | Published: March 25, 2016 09:25 PM2016-03-25T21:25:55+5:302016-03-25T23:37:39+5:30

करवीरच्या तालुक्यातील प्रकार : वनस्पती, झाडे-झुडपे जळून खाक, प्राणी, पशुपक्षी यांचे जीवन धोक्यात

Big loss of biodiversity due to fires in the mountains | डोंगरांतील आगींमुळे जैव संपत्तीचे मोठे नुकसान

डोंगरांतील आगींमुळे जैव संपत्तीचे मोठे नुकसान

Next

शिवराज लोंढे --सावरवाडी -सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असल्याने करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगरांना आग लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत. डोंगर पेटू लागल्याने नैसर्गिक, जैविक हानी होऊ लागली आहे. जंगली वनस्पती, झाडे-झुडपे, जंगली झाडे यांचे आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.
ग्रामीण भागातील जंगलांना अज्ञात लोकांकडून आग लावण्याच्या प्रकारांचा जंगलसंपत्तीवर मोठ्या प्रमाणात आघात होऊ लागला आहे. डोंगर पेटविल्याने जंगली प्राणी, पशुपक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे. रात्री-अपरात्री अज्ञात लोकांकडून जंगलांना आग लावली जाते. ‘एकीकडे झाडे लावा, जंगल वाचवा’चा नारा दिला जातो, तर दुसरीकडे डोंगर पेटवून नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होते. ग्रामीण भागातील डोंगरी भागात पावसाळ्यात वैरणीसाठी गवताचा वापर केला जातो. उन्हाळ्यात जंगली राने पेटविली जातात. त्याचे कारण पावसाळ्यात गवत जादा येते. ही डोंगरी लोकांची खुळी समजूत आहे. जंगलांना आग लागल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. या आगीत जंगली झाडे, गवताच्या गंज्या, पशुपक्ष्यांचे नुकसान होते. जंगली प्रदेशातील पक्षांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. जंगली लांडगे, ससे, भेकर, साप, कोल्हे यांची संख्या कमी होऊ लागली. चिमण्या, कावळे, रानपक्षी यांना भक्ष्य मिळत नाही. पशुपक्षांची घरटीही या आगीत जळून खाक होतात. परिणामी, जंगली संपत्तीचे आपणच नुकसान करतो.
मार्च-एप्रिल महिन्यांत ग्रामीण भागातील डोंगरांना आगी लावण्याचे प्रकार घडतात. एकीकडे हवेत वाढती उष्णता आणि दुसरीकडे रात्रीच्यावेळी जंगलांना आगी लावणे यामुळे नैसर्गिक जीवसृष्टी धोक्यात येऊ लागली आहे. डोंगरांना आग लागल्यामुळे सरपटणारे प्राणी मरतात. तसेच लहान-मोठी झाडे-झुडपे आगीत जळून जातात. त्यामुळे ‘जंगल वाचवा’ हा विचार नष्ट होतो.
डोंगरांना आग लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते. त्यामुळे डोंगरी भागात गवत वाढण्याची क्षमता कमी होते. गवत कापणीनंतर डोंगरांना आगी लावून झाडे-झुडपे पेटवून देतात. त्यामुळे औषधी वनस्पती जळून जातात. पशुपक्ष्यांचा निवारा नष्ट होतो. परिणामी, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मोरांच्या घरट्यातील अंडीही आगीमुळे फुटली जातात.


डोंगरी गावांना आग लावण्याच्या प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. त्यासाठी वन विभागाने गावागावांत प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. आगीमुळे नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तरुणांनी पुढाकार घेऊन पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून लढा उभारावा.
-बंटी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष,
राष्ट्रीय समाज पक्ष.

राज्य व केंद्र शासन जंगल वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करते; पण समाजातील काही लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत नाही. डोंगरांना आग लावण्याच्या प्रवृत्तीविरोधी कडक कारवाई होणे गरजेचे आहे. जंगले वाचविणे आवश्यक आहे.
- राजेंद्र सूर्यवंशी,
करवीर पंचायत समिती सदस्य.

Web Title: Big loss of biodiversity due to fires in the mountains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.