मोठी बातमी: कागलच्या राजकारणात उलथापालथ; घाटगेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:08 PM2024-08-21T12:08:11+5:302024-08-21T12:09:40+5:30

समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

Big news Samarjit Ghatge meets Sharad Pawar likely to join the ncp party | मोठी बातमी: कागलच्या राजकारणात उलथापालथ; घाटगेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला!

मोठी बातमी: कागलच्या राजकारणात उलथापालथ; घाटगेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला!

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर कागल विधानसभा मतदारसंघात मोठं राजकीय आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ३ सप्टेंबरला पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून, यावेळी घाटगे यांचा पक्षात प्रवेश होणार आहे. गैबी चौकात मेळावा घेऊनच ते रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. समरजीत यांची भूमिका स्पष्ट झाल्याने कागल विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं असून, महायुतीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाविकास आघाडीचे समरजीत घाटगे अशी थेट लढत तिथे होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

विधानसभेच्या मागील निवडणुकीत 'कागल'मध्ये तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात उतरले होते. यावेळी समरजीत घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी केली आहे, मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन पालकमंत्री मुश्रीफ यांना पाठिंवा दिल्याने 'कागल'चे राजकारण वेगळ्या वळणावर आले. समरजीत घाटगे यांनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती. आघाडीमध्ये 'कागल'ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याने त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण, ते मुंबईत नसल्याने भेट झाली नाही. 

अपक्ष लढलो आणि तिरंगी लढत झाली तर मतविभागणी होते आणि त्याचा फटका बसतो, असे समरजीत यांचे म्हणणे होते. त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतल्याचे समजते. घाटगे यांचे भाजपनेच पुनर्वसन करावे, असा मंत्री पाटील यांचा प्रयत्न होता. परंतु, तीन पक्षांच्या सरकारमध्ये सद्यः स्थितीत त्यास अडचणी असल्याने आणि विधानसभा लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केल्यामुळे समरजीत यांनी भूमिका घेतल्याचे समजते.

'लोकमत'चे वृत्त खरे.. '

लोकमतने ७ ऑगस्टलाच समरजीत घाटगे तुतारी फुंकणार असल्याचे वृत्त दिले होते. ५ ऑगस्टला मुरगूडला त्यांचा मेळावा झाला. त्यामध्ये त्यांनी मी लढणार हे स्पष्टच आहे. फक्त एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल हेच ठरलेले नाही, असे जाहीर केले होते. आता त्यांनी एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल त्याचाही निर्णय घेऊन टाकला आहे. 

राजू शेट्टी यांच्यासारखे व्हायला नको.. 

मुश्रीफ मुत्सद्दी असल्याने एवढ्या लवकर पत्ते ओपन करायला नकोत, असेही काहींना वाटत होते. परंतु, लोकसभेला राजू शेट्टी उमेदवारीचा घोळ घालत बसले आणि त्याचा त्यांना फटका बसला. त्यामुळे एकदा निर्णय घेतला तर तो जाहीर करायला विलंब कशाला, असाही विचार समरजीत यांनी केल्याचे दिसते.

तिरंगी लढत अडचणीची? 

'कागल मतदारसंघात १९९८ पासूनच्या लढती पाहिल्या तर दुरंगी लढती काटाजोड झाल्या आहेत. तिरंगी लढतीत हसन मुश्रीफ यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. हे घाटगे यांना माहीत असल्याने सरळ लढत करण्यासाठी हातात तुतारी घेण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळेच त्यांनी 'आर या पार'चा निर्णय घेतला आहे.

Web Title: Big news Samarjit Ghatge meets Sharad Pawar likely to join the ncp party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.