kolhapur news: विशाळगडावर पोलिसांची मोठी कारवाई, अवैध धंद्यांवर टाकले छापे; शिवप्रेमींमधून समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 12:20 PM2023-01-21T12:20:46+5:302023-01-21T12:21:14+5:30

वनविभागासह, महसूल,पुरातन, बांधकाम व आता पोलिस कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची झोप उडाली

Big police action at Vishalgad in Kolhapur, raids on illegal businesses | kolhapur news: विशाळगडावर पोलिसांची मोठी कारवाई, अवैध धंद्यांवर टाकले छापे; शिवप्रेमींमधून समाधान

kolhapur news: विशाळगडावर पोलिसांची मोठी कारवाई, अवैध धंद्यांवर टाकले छापे; शिवप्रेमींमधून समाधान

googlenewsNext

आंबा : दुपारची बाराची वेळ, आकस्मिक गडाच्या पायथ्याशी चार पोलिसांच्या गाड्या लागल्या नि कोणाला कळायच्या आत दुकाने, हाॅटेल, पानपट्टी यांची झडती सुरू झाली. चोरटी दारू, तंबाखू, सिगारेट, मावा, गुटखा, गांजा, प्लास्टिक यांची तपासणी मोहीम पोलिसांनी हाती घेतली. पायथ्याची दुकाने, गडावरील दर्गा व झेंडा चौक परिसरातील दुकानांची झाडाझडती घेत अवैध व्यवसायात गुंतलेल्यावर कारवाईचा बडगा लगावला. जिथे भाविक मुक्कामी होते तिथे खोल्यातून तपास करून मद्यपींना दंड केला.

काहींना दोनशे रुपयांचा दंड करून त्यांना समज देऊन सोडण्यात आले. कारवाईतील व्यावसायिकांना पोलिस स्थानकात कारवाईच्या पूर्ततेसाठी बोलावले आहे. गडावर चोरटी दारूविक्री, हुक्का, गांजा पत्त्यांचा डाव, पार्टीचे फोटो दोन दिवसांपूर्वी पोलिसांपर्यंत पोहोचवून यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार आज शाहूवाडी व कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली. गडावर ही पहिलीच मोठी पोलिस कारवाई झाल्याने शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

विशाळगड राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित असताना गेल्या दशकभरात गडावरील महसूल व पुरातन विभागाच्या जागेत अतिक्रमणे वाढली आहेत. येथील बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असतानाच गडावर चार दिवसांपूर्वी रोजा इमारतीच्या परिसरात कोंबडी कत्तलखाना उभारण्यात आला. याची तक्रार शिवभक्तांनी करताच तहसीलदार गुरू बिराजदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने अतिक्रमण रोखले. त्यानंतर तीन दिवसांत आज पोलिसांनी गडावरील दुकानांवर छापे टाकून अवैध धंद्यांना लगाम लावला.

गजापूर वाणीपेठ येथे पोलिसांनी उभारलेल्या चेक नाक्यावर वाहने थांबवून तपासणी लक्ष केंद्रित केले. गाड्या तपासूनच भाविकांना गडावर सोडले जात होते. वनविभागासह, महसूल,पुरातन, बांधकाम व आता पोलिस कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची झोप उडाली आहे. 

सत्तर हजारांचा गुटखा पकडला

येथील अकबर पठाण यांच्या पानटपरीच्या छाप्यात सत्तर हजाराच्या गुटखा पुड्या पकडल्या. बाहेरून येऊन येथे मोक्याच्या जागा बळकावून अतिक्रमणाबरोबर अवैध धंद्यातही वरकमाई करणारी व्यावसायिकता येथे रुजली आहे. दुपारी बारा ते सायंकाळी सातपर्यंत पोलिसांचे छापा सत्र येथे चालू राहीले. शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रसाद कोळसे, सचिन पांढरे, प्रियंका सरादे यांनी आजची कारवाई केली.

Web Title: Big police action at Vishalgad in Kolhapur, raids on illegal businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.