कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ, दीड महिना आधीच दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 03:16 PM2024-09-18T15:16:49+5:302024-09-18T15:17:29+5:30
पगारवाढीचा करार : हसन मुश्रीफ यांची कर्मचाऱ्यांना गोड भेट : ३७.५० कोटी फरकही मिळणार
कोल्हापूर : जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा करार सोमवारी कामगार युनियनसोबत झाला असून, ८८ महिन्यांचा ३७ कोटी ५० लाख फरकही तीन टप्प्यांत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. बँकेच्या १२५० कर्मचाऱ्यांना दीड महिने अगोदरच अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवाळीची भेट दिल्याने कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील २०१५ ला बँकेच्या चाव्या संचालक मंडळाकडे आल्यानंतर गेल्या नऊ वर्षांत संचित तोटा कमी करून देशातील अग्रगण्य बँक म्हणून नावारूपाला आणली. यामध्ये अध्यक्ष हसन मुश्रीफ, संचालक मंडळासोबतच कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. बँक सक्षम झाल्यानंतर पगारवाढीचा करार करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष राजू आवळे, संचालक आमदार सतेज पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी गोरख शिंदे, युनियनचे अतुल दिघे, बळी पाटील, भगवान पाटील, आनंदराव परुळेकर, आय. बी. मुन्शी, भगवान पाटील, नारायण मिरजकर, प्रकाश जाधव, दिलीप लोखंडे व संचालक उपस्थित होते.
असा मिळणार ३७ कोटी फरक..
- कालावधी : १ एप्रिल २०१७ ते ३१ जुलै २०२४
- रक्कम : ३७.५० काेटी
- ऑक्टोबर २०२४ : १२.५० कोटी
- ऑगस्ट २०२५ : १२.५० कोटी
- ऑगस्ट २०२६ : १२.५० कोटी
- ऑगस्ट २०२४ पासून अशी मिळणार पगारवाढ ...
- आता सेवेत लागलेले अनुकंपा : दरमहा २०० ते ५०० रुपये
- २०१८ ला सेवेत : ५०० ते ६०० रुपये
- जुने कर्मचारी : १००० ते ४५०० रुपये
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही ‘प्रोत्साहन’
एप्रिल २०११ ते मार्च २०१७ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे ६८५ कर्मचाऱ्यांना प्रति महिना १०० रुपये प्राेत्साहन म्हणून देण्यात येणार आहे.
नवीन भरतीतील कर्मचाऱ्यांना पगार कमी
भरतीनंतर सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणीनुसार म्हणजेच जुन्या कर्मचाऱ्यांपेक्षा तीन ते चार हजाराने पगार कमी राहणार आहे.
चार दावेही घेतले मागे
कामगार युनियनने पदोन्नतीसह इतर चार दावे बँकेविरोधात दाखल केले होते. मात्र, त्यापैकी बहुतांशी गोष्टीची पूर्तता बँकेने केल्याने दावे मागे घेतले जाणार आहेत.
पुणे, सांगली, सातारा या जिल्हा बँकांचा अभ्यास करून ही पगार वाढ लागू केली. संचालकांनीही मोठ्या मनाने पगारवाढीला संमती दिली आहे. कर्मचाऱ्यांनी बँक ही आपली माता आहे, या भावनेने काम करावे. ठेव व व्यवसाय वाढीसाठी झोकून देऊन काम करा. - हसन मुश्रीफ (अध्यक्ष, जिल्हा बँक)