आई-वडील वृद्धाश्रमात ही मोठी शोकांतिका
By admin | Published: January 7, 2015 09:56 PM2015-01-07T21:56:26+5:302015-01-08T00:03:14+5:30
आपण स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगले पाहिजे.
उत्तूर : देव घरातील नंदादीप म्हणजे आई-वडील आहेत. यांचा नवीन पिढीला विसर पडला आहे. २१ व्या शतकात संपत्ती असूनदेखील आई-वडिलांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते ही एक मोठी शोकांतिका असल्याचे मत प्रा. रवींद्र कोकरे (फलटण) यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्या संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना ‘ग्रामीण कथाकथनातून लोक जागृती’ याविषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धामणेचे ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील होते. यावेळी संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन लोकरे यांच्या हस्ते झाले. प्रा. लोकरे म्हणाले, आपण स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगले पाहिजे. आपल्या मुलांना टी. व्ही. पेक्षा पुस्तकाची गोडी अधिक लावा. संस्काराची शिदोरी ही आईकडून मिळते, तिला विसरू नका. सुशिक्षित मुलांचे आई-वडील हे वृद्धाश्रमात तर निरक्षर, शेतकरी मुलांची आई-वडील घरात आहेत हे वास्तव आहे. पाश्चात्य संस्कृतीमुळे जीवनाची घडी बदलत चालली आहे.
‘बंड’ नावाच्या कथेने प्रा. लोकरे यांनी उत्तूरकरांची मने जिंकली. यावेळी पोलीसपाटील अशोक पाटील, टी. के.पाटील, महेश करंबळी, पुंडलिक पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. श्रीकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)