जेवढा मोठा संघर्ष तेवढे यश मोठे : विश्वास नांगरे - पाटील; न्यू कॉलेजमध्ये विशेष व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 04:42 PM2019-02-07T16:42:40+5:302019-02-07T16:44:27+5:30
जेवढा मोठा संघर्ष तेवढे यशही मोठे असते. आयुष्यात कष्टामुळे परिवर्तन होईल. उज्ज्वल भविष्यासाठी ऐन तारण्यात ध्येय निश्चित करून त्या दिशेने अथक परिश्रमाने वाटचाल केल्यास यश निश्चित आहे. तुमचे विचार तुमचे शब्द बनतात, तुमचे शब्द तुमची कृती बनते. कृतीतून सवय निर्माण होते. त्यामुळे तुमचे विचार बदला आणि यशस्वी जीवनाच्या लाटेवर स्वार व्हा, असे प्रतिपादन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
कोल्हापूर : जेवढा मोठा संघर्ष तेवढे यशही मोठे असते. आयुष्यात कष्टामुळे परिवर्तन होईल. उज्ज्वल भविष्यासाठी ऐन तारण्यात ध्येय निश्चित करून त्या दिशेने अथक परिश्रमाने वाटचाल केल्यास यश निश्चित आहे. तुमचे विचार तुमचे शब्द बनतात, तुमचे शब्द तुमची कृती बनते. कृतीतून सवय निर्माण होते. त्यामुळे तुमचे विचार बदला आणि यशस्वी जीवनाच्या लाटेवर स्वार व्हा, असे प्रतिपादन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
न्यू कॉलेज आयोजित व्याख्यानात ‘२१ व्या शतकामध्ये युवकांसमोरील आव्हाने’ या विषयावर गुरुवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील होते. पाटील म्हणाले, जीवन खूप सुंदर आहे. मळलेल्या वाटेवर न जाता नवीन वाट शोधण्याचा प्रयत्न करा. फक्त त्या वाटेवर चालण्यासाठी कष्ट व जिद्द तुमच्याकडे पाहिजे. आयुष्यात अहंकार कधीच ठेवू नको, योग्य वेळी लहान व योग्य वेळी मोठे होण्यासाठी प्रयत्न करा. सोशल मिडिया हे अस्त्र आहे. त्यामुळे त्याचा वापर सावधगिरीनेच केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
डी. बी. पाटील म्हणाले, युवकांनी सकारात्मक विचार करा, फक्त नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्याची तयारी करावी लागेल.
उपप्राचार्य टी. के. सरगर यांनी आभार मानले. तर डॉ. के. ए. गगराणी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन आर. डी. पाटील, संस्था अध्यक्ष आर. एस. चरापले,आर. डी. आतकिरे, प्राचार्य व्ही. एम. पाटील, प्रा. विनय पाटील, एस. एन. इनामदार, डी. जी. किल्लेदार यांच्यासह प्राध्यापक,शिक्षक, प्रशासकीय सेवक आदीनी मोठी गर्दी केली होती.
गहिवरली तरुणाई...
मुंबईवर झालेल्या २६-११ च्या दहशतवादी हल्यात आठवणी सांगताना नांगरे-पाटले म्हणाले, ताजमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी मी एक तुकडी घेऊन त्याठिकाणी गेलो. दहशतवाद्यांकडे एके-४७ अन् आमच्याकडे सर्व्हिस रिर्व्हालवर होती. मात्र आम्ही आता मागे हटायचे नाही. एका रुममधून आम्ही सीसीटिव्हीच्या माध्यमातून त्यांच्यावर नजर ठेवून होतो. त्यावेळी त्या रुमला आगीने पेटे घेतल्याने आम्ही बाहेर पडलो.
बाहेर पडताना माझा अंगरक्षक राहुल शिंदेच्या पायात तीन अन् पोटात एक गोळी घुसली. त्यामध्ये तो शहीद झाला. शेवटच्या क्षणी त्याचा हात बंदूकीच्या ट्रिगरवर अन् डोळे आकाशाकडे पाहाते उघडे होते. त्याच्या चेहयावर देशभक्तीचे तेज अन् कर्तृत्व दिसत होते, असे क्षणाचे वर्णन ऐकताच उपस्थित सर्वजण गहिवरले.
आठवणींनी उजाळा....
नांगरे - पाटील यांनी अकरावीला वडीलांच्या सोबत या महाविद्यालयातील प्रवेश, सायकल लावण्यासाठी शोधलेली जागा, ग्रंथालय, एन.सी.सी या सागळ््या आठवणी पुन्हा ताज्या झाले असे सांगत, आपल्या कॉलेज दिवसातील किस्से त्यांनी याप्रसंगी सांगितेल. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती, तसेच आपल्या मोबाईलमध्ये हे व्याख्यान ही अनेकांनी रेकॉडिग करून घेण्यासाठी धडपड सुरु होती.