बिहार पॅटर्न सर्व ग्रामपंचायतीत राबवू
By Admin | Published: June 4, 2015 11:58 PM2015-06-04T23:58:19+5:302015-06-05T00:19:39+5:30
तासगावच्या ‘बीडीओं’ची माहिती : प्रत्येक गावात वृक्ष संवर्धनासाठी आज बैठक--लोकमतचा दणका
तासगाव : वृक्ष संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘बिहार पॅटर्न’ची तासगाव तालुक्यातील केवळ तीनच गावांनी अंमलबजावणी केली आहे. अन्य गावांनी मात्र या योजनेकडे पाठ फिरवली होती. याबाबत ‘लोकमत’मधून दि. ४ रोजी ‘वृक्ष संवर्धनाचा बिहार पॅटर्न तासगावात फेल’ अशी बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्याची दखल घेत तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी हा पॅटर्न तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ग्रामसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे.
वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. मात्र या वृक्षांचे संगोपन होत नाही. परंतु बिहार पॅटर्ननुसार रोजगार हमी योजनेतून वृक्ष संगोपनाचा कार्यक्रम राबविला गेल्यास वृक्षांचे चांगल्या पध्दतीने संगोपन होऊ शकते. तासगाव तालुक्यातील हातनूर, वंजारवाडी आणि सावर्डे या तीन ग्रामपंचायतींनी बिहार पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली आहे. हातनूर ग्रामपंचायतीकडून गेल्या दोन वर्षापासून या पॅटर्ननुसार वृक्षांचे संगोपन करण्यात येत आहे. हा पॅटर्न यशस्वी ठरला असतानादेखील तालुक्यातील अन्य ६५ ग्रामपंचायतींकडून मात्र तो राबविण्यास टाळाटाळ केल्याचे चित्र होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी सर्वच ग्रामपंचायतींना या पॅटर्नची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतीने केवळ मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याऐवजी ५०० ते एक हजार या प्रमाणात पहिल्या टप्प्यात यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. बिहार पॅटर्ननुसार तीन वर्षे या वृक्षांच्या संगोपनासाठी रोजगार हमी योजनेतून निधीची तरतूद करून देण्यात येणार असून, याबाबत शुक्रवारी ग्रामसेवकांची बैठक घेण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी दिली. (वार्ताहर)
लोकप्रतिनिधींचा पुढाकार हवा
वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. बिहार पॅटर्नसाठी पंचायत समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी, तसेच ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्यांनी पुढाकार घेतल्यास खऱ्याअर्थाने बिहार पॅटर्न यशस्वी होण्यास मदत होणार आहे.