कोल्हापुरातही आता ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा : ‘अॅस्टर आधार’चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:32 AM2018-09-15T00:32:07+5:302018-09-15T00:33:06+5:30
जिथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही अशा गल्लीबोळांतही जाऊन तातडीने उपचार करण्याची सोय आता कोल्हापुरातही प्रथमच उपलब्ध झाली आहे.
कोल्हापूर : जिथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही अशा गल्लीबोळांतही जाऊन तातडीने उपचार करण्याची सोय आता कोल्हापुरातही प्रथमच उपलब्ध झाली आहे. अॅस्टर आधार व आयुर्झोन इंडिया रेमिडीज यांच्यातर्फे तीन बाईक अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाल्या आहेत. या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आज, शनिवारी दुपारी तीन वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे.
कोल्हापुरासह अनेक शहरांत किंवा मुख्यत: शहराच्या जुन्या भागांत रस्ते फारच अरुंद आहेत. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, जुना बुधवार, शनिवार पेठ परिसरात ही स्थिती आहे. गल्लीबोळांतून मोठी रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात व त्यामुळे वेळेत उपचार न झाल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरातच रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीमुळे वाट न मिळाल्याने रुग्ण दगावल्याची घटना घडली आहे.
अशा घटना होऊ नयेत म्हणून बाईक अॅम्ब्युलन्सची सोय फार महत्त्वाची ठरणार आहे. ही सेवा आता मुंबईत सुरू आहे. अत्याधुनिक सोईसुविधांनी सज्ज असलेल्या अॅस्टर आधार हॉस्पिटलने ही सेवा सुरू करण्यात पुढाकार घेतला आहे. ही सेवा मोफत आहे. तुम्ही कॉल करून या अॅम्ब्युलन्सला बोलाविले की त्याच्यासोबत असणारे डॉक्टर तातडीने जाऊन रुग्णांवर प्राथमिक उपचार करतील व आवश्यकता असल्यास मोठी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल करतील.
या सोहळ्यास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचे संचालक दिलीप जाधव हेही उपस्थित राहणार आहेत. शास्त्रीनगरातील अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
या ठिकाणी थांबणार बाईक अँम्ब्युलन्स
अंबाबाई मंदिर परिसर--राजारामपुरी परिसर---राष्ट्रीय महामार्ग- तावडे हॉटेल
संपर्क मोबाईल : ७२७००१०१०१