ऑईलवरून दुचाकी घसरल्याने एक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:26+5:302021-03-17T04:23:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोनवडे (ता. करवीर) येथे रस्त्यावर पडलेल्या ऑईलवरून दुचाकी गाडी घसरल्याने डोके रस्त्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोनवडे (ता. करवीर) येथे रस्त्यावर पडलेल्या ऑईलवरून दुचाकी गाडी घसरल्याने डोके रस्त्यावर आपटून तरुणाचा मृत्यू झाला. एकनाथ बंडा पाटील (वय २७, रा. सुळे, ता. पन्हाळा ) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुभम बाळू शिरगावकर (२६, रा. कोपार्डे ता. करवीर) हा जखमी झाला आहे. सकाळी साडेनऊच्या दरम्यान
हा अपघात झाला.
अधिक माहिती अशी, एकनाथ पाटील हा कोपार्डे येथे आपल्या मामाच्या गावी राहायला होता. दुचाकी (क्र. एच ०९ डी ई ८९२७)वरून एकनाथ मामाचा मुलगा शुभमबरोबर कोल्हापूर येथे कामावर निघाला होता. सकाळी ९.३० वाजता वाकरे फाटा व दोनवडेदरम्यान असलेल्या उतारावर रस्त्यावर पडलेल्या ऑईलमुळे एकनाथची गाडी घसरली. त्यात एकनाथचे डोके रस्त्यावर जोरात आपटल्याने डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामेभाऊ शुभम याच्या ही डोक्याला गंभीर मार
लागला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात झाल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली. एकनाथ हा एका पायाने अपंग असला तरी कोल्हापूर येथे बीबियाण्याच्या दुकानात कामावर जात होता. अपघाती मृत्यूने सुळे व कोपार्डे येथे शोककळा पसरली. अपघातानंतर मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती, तब्बल दोन तासानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले.
चौकट १)हेल्मेट नसल्याने बळी --
एकनाथ याची दुचाकी घसरल्याने त्याचे डोके रस्त्यावर आपटले जर हेल्मेट डोक्यावर असते तर त्याचा जीव वाचला असता. एकनाथला दुसरी कोणतीही इजा झाली नव्हती.
१)दोनवडे अपघात मृताचा
फोटो
१६एकनाथ बंडा पाटील