एकच मिशन, जुनी पेन्शन; सरकारी कर्मचाऱ्यांची कोल्हापुरात भव्य बाईक रॅली
By समीर देशपांडे | Published: September 21, 2022 02:21 PM2022-09-21T14:21:53+5:302022-09-21T14:22:24+5:30
‘एकच पेन्शन, जुनी पेन्शन’, ‘जुनी पेन्शन हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.
कोल्हापूर : अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी बाईक रॅली काढली. ‘एकच पेन्शन, जुनी पेन्शन’, ‘जुनी पेन्शन हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.
दसरा चौकातून रॅलीला सुरूवात झाली. तत्पूर्वी सकाळी दहापासूनच दसरा चौकामध्ये विविध सरकारी विभागातील कर्मचारी दाखल होण्यास सुरूवात झाली. अनेकांनी लाल टोप्या परिधान केल्या होत्या. त्यावर जुनी पेन्शन लिहले होते. लाल झेंडे, समोर रिक्षातून घोषणाबाजी करत कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
यावेळी जिल्हा शाखेचे सरचिटणीस अनिल लवेकर म्हणाले, २१ ऑगस्ट २०२२ रोजी नाशिक येथे झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सभेत जुन्या पेन्शनसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ जानेवारी २०१९ रोजी या संदर्भात अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतू साडे तीन वर्षे झाली याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यापुढे जर याबाबत निर्णय झाला नाही तर काम बंद आंदोलन करावे लागेल असा इशाराही दिला.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, अनिल लवेकर, संजय क्षीरसागर, राजू गंधवाले, संजय खोत, सुनील देसाई, सतीश ढेकळे, अनिल खोत, संदीप नलवडे, आखिल शेख, धोंडिराम चव्हाण, जयदीप कांबळे, संतोष पांगम, गणेश आसगावकर, योगेश यादव, प्रकाश पाटील, रमेश भोसले, बी. एस. खोत, उदय लांबोरे, सुधाकर सावंत, उमेश देसाई यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तायक कवतिके यांच्याकडे निवेदन दिले.