Kolhapur: आजऱ्याजवळ बाईक रायडरची कारला भीषण धडक; हेल्मेट तुटले, स्पोर्ट्स बाईकचा चक्काचूर; तरुण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:00 IST2025-04-21T13:00:10+5:302025-04-21T13:00:35+5:30
आजरा : आजरा आंबोली राष्ट्रीय महामार्गावर देवर्डे ते माद्याळ तिट्टादरम्यान झालेल्या मोटरसायकल व चार चाकीच्या अपघातात कोल्हापूर येथील बाईकर ...

Kolhapur: आजऱ्याजवळ बाईक रायडरची कारला भीषण धडक; हेल्मेट तुटले, स्पोर्ट्स बाईकचा चक्काचूर; तरुण ठार
आजरा : आजरा आंबोली राष्ट्रीय महामार्गावर देवर्डे ते माद्याळ तिट्टादरम्यान झालेल्या मोटरसायकल व चार चाकीच्या अपघातातकोल्हापूर येथील बाईकर सिद्धेश विलास रेडेकर (वय २३ रा. माळी काॅलनी, टाकाळा कोल्हापूर ) याचा मृत्यू झाला आहे. तो कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता. बारा लाखांच्या रायडर गाडीचा अपघातात चक्काचूर झाला आहे.
सिद्धेश रेडेकर हा आपल्या चार मित्रांसमवेत आज सकाळी आंबोली येथे बाईक रायडिंगसाठी आला होता. त्याच्यासोबत फरहाद खान (रा.रुईकर कॉलनी) नितांत कोराणे (रा. रंकाळा अंबाई टॅंक ) अमेय रेडीज (रा. नागळा पार्क सर्व रा. कोल्हापूर ) आपल्या गाडीने आले होते. कोल्हापुरी येथून सकाळी ६ नंतर सर्वजण रायडिंगसाठी निघाले होते. आंबोलीत येऊन त्यांनी घाटातील विविध ठिकाणी फोटोसेशनही केले. सिद्धेश रेडेकर याला मोटरसायकल बायकिंग व फोटोग्राफीची आवड होती. सकाळी ११ नंतर ते कोल्हापूरकडे जाण्यास निघाले.
सिद्धेश पुढे होता तर त्याच्या पुढे एक तर मागे दोन मित्र होते. ते परत जात असताना देवर्डे माद्याळदरम्यानच्या धोकादायक वळणावर कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे जाणाऱ्या तवेरा गाडी व सिद्धेशच्या गाडीचा जोराची धडक झाली. अपघातात त्याच्या डोक्याचे हेल्मेट रस्त्याच्या कडेला तुटून पडले होते. त्याच्या हाताला, छातीला व डोकीला गंभीर दुखापत झाली होती.
त्याला तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचार करून गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सिद्धेश रेडकर याचा मित्र नितांत कोराने यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिल्याने तवेरा गाडीचा चालक विजय अरविंद पाटील (रा. यादवनगर कोल्हापूर ) याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेल्मेटही तुटले
अपघातस्थळी रायडिंगसाठी घेतलेली सिद्धेशच्या बारा लाखांच्या गाडीचा चक्काचूर होऊन पडली होती. याच ठिकाणी रायडिंगसाठी वापरले जाणारे ७० हजारांचे हेल्मेट व कॅमेराही पडला होता.
महिन्यात पाच जणांचा मृत्यू
सुळेरानजवळील अपघातात गोव्याची महिला तर गव्याच्या हल्ल्यात हात्तीवडेचा अजित कांबळे, पाठोपाठ साळगाव तिट्ट्यावर सुतार व रजाक शेख यांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. आज सिद्धेश रेडेकर यांच्यारुपाने महामार्गावरील अपघातात महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.