Kolhapur: टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, हेल्मेट नसणे बेतले जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 04:40 PM2024-05-18T16:40:21+5:302024-05-18T16:41:18+5:30
प्रकाश पाटील कोपार्डे : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ...
प्रकाश पाटील
कोपार्डे : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. भाऊसो कृष्णात पाटील (वय ४३ रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पाडळी खुर्द येथील आंबेडकर चौकात आज, शनिवारी (दि. १८) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाऊसो पाटील बाजार समितीत एका व्यापाऱ्याकडे कामाला होते. नेहमी प्रमाणे आज, सकाळी शेतातील काम आटोपून घरी आले. कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने ते गडबडीत दुचाकीवरून (क्र. एम एच ०९ डी आर ३०८७) कामावर निघाले होते. नेहमी हेल्मेट घालणारे भाऊसो आज हेल्मेट न घालताच बाहेर पडले. गावाच्या वेशीवर आले असता स्पीडब्रेकर ओलांडून जाताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला. दरम्यान समोरून येणाऱ्या स्क्रॅपच्या टेम्पोला (क्र.एम एच ०२ एक्स ए ७९४०) दुचाकीची जोरात धडक झाली.
धडकेत वीस फूट उडून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावर डोके आपटल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
हेल्मेट असते तर..
कामावर जाताना भाऊसो पाटील नेहमी डोक्यात हेल्मेट घालून प्रवास करत होते. आज शेतात खत टाकून आल्यावर कामावर उशीर होईल म्हणून हेल्मेट घातले नाही. भाऊसोच्या दुचाकीची टेम्पोला धडक बसल्यावर त्याच्या डोक्यालाच मार लागला. इतर कोणत्याही भागाला जखम झाली नाही. जर हेल्मेट असते तर भाऊसोचा जीव वाचला असता.