Accident: भरधाव एस. टी. बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 04:24 PM2022-08-03T16:24:53+5:302022-08-03T16:25:29+5:30
कळंबा ते गारगोटी रस्त्यावर पॉवरग्रीटनजीक घटनास्थळ परिसरात ओढ्यावर धोकादायक वळण आहे. गेल्या चार वर्षात या मार्गावर सुमारे १३ जण अपघातात बळी गेले, अनेकजण जखमी झाले.
कळंबा : भरधाव एस. टी. बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत दुचाकीस्वार पती जागीच ठार झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना कळंबा ते गारगोटी मार्गावर कात्यायणी घाट, कळंबा पॉवर ग्रीट, घोडके मळानजीक मंगळवारी सकाळी घडली. चंदर तुकाराम कांबळे (वय ४२, रा. नागाव, ता. करवीर) असे ठार झालेल्याचे नाव असून त्यांची पत्नी सारीका कांबळे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चंदर कांबळे व त्यांच्या पत्नी सारीका कांबळे हे दाम्पत्य आपल्या दुचाकीवरुन नागाव येथून कोल्हापूरला येत होते. त्याचवेळी कोल्हापूरहून नंदगावकडे जाणारी एस. टी. बस भरधाव वेगाने जात होती. ही बस राँग साईटला आल्याने समोरुन येणाऱ्या कांबळे दाम्पत्याच्या दुचाकीला त्यांची जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील कांबळे दाम्पत्य रस्त्यावर जोरात आपटले. त्यामध्ये चंदर कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सारीका कांबळे यांना तत्काळ उपचारासाठी खासगी वाहनाने सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, दुर्घटनेत दुचाकी एस. टी. बसच्या पुढील चाकाखाली सापडल्याने तिचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कोल्हापूर ते गारगोटी मार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दुर्घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून, बसचालक संदीप गणपती पाटील (रा. चंद्रे, ता. राधानगरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार वर्षात १३ बळी
कळंबा ते गारगोटी रस्त्यावर पॉवरग्रीटनजीक घटनास्थळ परिसरात ओढ्यावर धोकादायक वळण आहे. गेल्या चार वर्षात या मार्गावर सुमारे १३ जण अपघातात बळी गेले, अनेकजण जखमी झाले. या वळणावर ना गतिरोधक, ना पुरेशी प्रकाश व्यवस्था. या रस्त्यावर किमान डझनभर हॉटेल्स, मंगल कार्यालये, पाणलोट क्षेत्रातील बेकायदेशीर अवैध बांधकामे, रस्त्यावर वाहनांचे बेशिस्त पार्किंग आहे. चांगला रस्ता असल्याने या मार्गावरुन वाहने सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे अपघाताची मालिकाच मार्गावर घडत आहे.