बाईक स्टाईलची धूम आता धोकादायक वळणार
By admin | Published: February 5, 2016 11:15 PM2016-02-05T23:15:07+5:302016-02-05T23:59:27+5:30
तरुणाईचा अतिउत्साह : महाविद्यालय, पोलीस आणि नंतर पालक यांनी ‘ब्रेक’ लावण्याची गरज
आयुब मुल्ला -- खोची महाविद्यालयीन तरुणाईच्या मैत्रीला, प्रेमाला अनेक कंगोरे धारण होत चाललेले आहेत. फॅशनच्या दुनियेत बाईकची स्टाइल धूम ठोकू लागली आहे. मुलगा-मुलगी तोंडावर स्कार्प बांधून रस्त्यांवरून नुसत्या गतीने नाही तर अतिवेगाने सुसाट धावताना दिसतात. हा वेग कामाच्या गडबडीत वेळेत पोहोचले पाहिजे यासाठी नसतो तर तो ईर्ष्येच्या स्टाईलचा असतो. यातूनच घात- अपघाताचे वाढते चित्र पहावयास मिळत आहे.महाविद्यालय, पोलीस आणि नंतर पालक यांनी पायबंद घातलाच पाहिजे. नाही तर तरुणाईची धूम स्टाईल आणखीन गती घेईल अन् पालकांना त्याचा पश्चात्ताप सहन करावा लागेल.सध्या अशा स्टाईलची चलती जादा आहे. कारण हा कालावधी टॅ्रडिशनल डे, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या रेलचेलीचा आहे. जादा अभ्यास नाही, परीक्षा तोंडावर नाहीत. त्यामुळे वर्षातील हा कालावधी जल्लोषाचा असल्याचे महाविद्यालय परिसरात जाणवते. वास्तविक तरुणाईच्या कलागुणांना संधी देणे म्हणजे गॅदरिंग होय. त्यांच्या दृष्टीने ही एक पर्वणीच असते.
सकाळपासून सायंकाळपर्यंत कार्यक्रमाच्या रुपरेषेपासून तो पार पडेपर्यंत अमाप उत्साह तरुणार्इंच्यात वावरत असतो; परंतु त्याचा लूकच बदलत चालला आहे. प्रामाणिकपणे आनंद साजरा करतो येतो; परंतु अतिउत्साही हाताच्या बोटांवर मोजण्याइतके विद्यार्थी मात्र गैरवर्तनाच्या मार्गाचा अवलंब करतात.पॉकेटमनी जास्त असतो. घरचेही अशा काळात फारसे लक्ष देत नाहीत. नेमक्या याच बाबींचा फायदा मैत्रीच्या, प्रेमाच्या नावाखाली लुटला तर जात नाही ना असे प्रश्न जाणकार व्यक्त करतात. आधुनिक तंत्रज्ञाने बनलेल्या बाईक, ती चालवणारा युवक, पाठीमागे बसलेली मैत्रीण, दोघांच्याही तोंडावर स्कार्प त्यामुळे आम्हाला कोण ओळखू शकत नाही, अशा गैरसमजुतीतून ते रस्त्यावरून सुसाट असतात.
स्टँड, हॉटेल, गार्डन, क्रीडांगण या ठिकाणीसुद्धा एकत्रितपणे अशी जोडपी आढळतात. ग्रामीण भागांतून शहरात आलेल्या व्यक्तींना हे चित्र पहायला मिळाल्यानंतर त्यांच्यात प्रश्नांची अंतर्गत सरबत्ती झाल्याशिवाय राहत नाही. मुळात शिक्षणाला महत्त्व देण्याचे प्रमाण सगळीकडेच वाढले आहे. तो निर्णयही स्वागतार्ह आहे; परंतु त्यातून चांगले परिणाम दिसले पाहिजेत. परीक्षा, क्रीडा प्रकारात बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनी उत्तम कामगिरी करीत आहेत. त्यांना सगळेजण शाबासकी देतात, पण काहीजण मैत्री, प्रेम सारखे बदलत आहेत. हे ते सर्व प्रसिद्धीसाठी खटाटोप करीत आहेत. ते थांबविण्यासाठी समाजातील जबाबदार घटकांनी पुढे आले पाहिजे.
शाळा, कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये आकर्षण असते; परंतु ते क्षणिक असते. क्षणिक आकर्षणामुळे ते काही काळासाठी एकत्र येतात. त्यातून बहुतांश प्रमाणात अडथळेच निर्माण होतात.
अखेर त्यांच्यामध्ये जी समस्या
निर्माण होते, तिचे सामाजिक समस्येत रूपांतर होते. यासाठी आम्ही प्रबोधनाचे काम शाळा, महाविद्यालयात जाऊन
करीत आहोत, असे जाधव म्हणाले.
दुचाकीवरून टिंगळटवाळी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी सुरू आहे. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. संरक्षणाची जबाबदारी सर्वच पद्धतीने हाताळली जात आहे.
- धनंजय जाधव, पोलीस
निरीक्षक, पेठवडगाव