दुचाकीची ट्रायल घ्यायला गेला अन् जिवाला मुकला

By admin | Published: January 17, 2016 12:45 AM2016-01-17T00:45:26+5:302016-01-17T00:58:37+5:30

सायबर चौकातील घटना

Bike trials were taken and Jivala Mukta was released | दुचाकीची ट्रायल घ्यायला गेला अन् जिवाला मुकला

दुचाकीची ट्रायल घ्यायला गेला अन् जिवाला मुकला

Next

कोल्हापूर : मित्राने घेतलेल्या दोन लाख किमतीच्या हायफाय मोटारसायकलची ट्रायल घेताना भरधाव मोटारसायकल सायबर चौकातील दुभाजकाला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यश शिवाजी चावरेकर (वय १८, रा. ग्रीन पार्क, समता कॉलनी, मोरेवाडी) असे त्याचे नाव आहे. हा अपघात शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. एकुलत्या मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, यश चावरेकर हा राजाराम कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. सकाळी घरातून तो चहा-नाष्टा करून क्लासला जाण्यासाठी मोपेडवरून बाहेर पडला. राजारामपुरी चौदावी गल्लीतील क्लासला उपस्थित राहून तो शाहू मिल येथील मामाच्या घरी गेला. तेथून तो मित्र तुषार जिनकर याला घेऊन राजारामपुरी चौथी गल्लीमध्ये आला. या ठिकाणी त्याचा दुसरा मित्र दोन लाख किमतीची नवीन मोटारसायकल घेऊन उभा होता. त्याच्याकडे त्याने नवीन गाडीची ट्रायल बघतो म्हणून मागून घेतली. मित्र तुषारला तेथेच सोडून तो एकटाच नवीन मोटारसायकलवरून (एम एच ०९ बीटी ९०९०) सुसाट सायबर चौकाच्या दिशेने गेला. यावेळी सम्राटनगर ते सायबर चौक मेनरोडवरील मल्हार हायटर्स बिल्डिंगच्या समोर येताच भरधाव मोटारसायकलवरील ताबा सुटून ती जोरात दुभाजकास धडकली. यावेळी यशचे रस्त्यावर डोके आपटून त्याचा जागीच मृत्यू झाला. सायबर चौक मार्गावर नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ होती. या अपघातामुळे नागरिकांनी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेची माहिती समजताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशचा मृतदेह शववाहिकेतून सीपीआर रुग्णालयात हलविला. त्यानंतर मोटारसायकल बाजूला घेत या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सावंत अधिक तपास करीत आहेत.
आई-वडिलांना धक्का
क्लासला गेलेल्या मुलाच्या अपघाताची बातमी समजताच आई-वडिलांना मानसिक धक्का बसला. यशचे वडील सेवानिवृत्त सहायक फौजदार आहेत. त्यांना चार मुलींनंतर यश झाला होता. त्यामुळे तो सर्वांचा लाडका होता. त्याचे मित्र व नातेवाइकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती.

पालकांनी मुलांना गतिमान वाहने देऊ नयेत. तरुणांनी वाहन चालविण्याचे योग्य ते प्रशिक्षण घेतले पाहिजे.
- आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर.

Web Title: Bike trials were taken and Jivala Mukta was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.