कोरोना सेंटर्समधील रुग्णांना जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराचे २५ लाख रुपयांचे बिल थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:38+5:302021-07-27T04:24:38+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील कोरोना सेंटर्समधील कोरोना रुग्णांना जेवणाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे शासनाने २५ लाख ...
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील कोरोना सेंटर्समधील कोरोना रुग्णांना जेवणाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे शासनाने २५ लाख रुपयांचे बिल थकवल्यामुळे ठेकेदार अडचणीत सापडला आहे. यामुळे कधीही जेवणाचा पुरवठा बंद होऊ शकतो. ठेकेदाराने किराणा दुकानांतील उधारी न भागविल्यामुळे बाजारात ठेकेदाराच्या उधारीची खमंग चर्चा सुरु आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापुरातील ठेकेदार कोरोना सेंटर्सना जेवण, चहा-नाष्टा पुरवत आहे. मात्र, शाहूवाडी तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभाराचा फटका या ठेकेदाराला बसला आहे. जेवणासाठी लागणारे साहित्य ठेकेदाराने बांबवडे बाजारातून उधारीवर घेतले आहे. गॅस सिलिंडरही उधारीवर घेतले आहेत. मात्र, तीन महिने झाले तरी तहसील कार्यालयाकडून बिले जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली जात नाहीत. त्यामुळे ठेकेदार अडचणीत सापडला आहे. पहिली उधारी दिल्याशिवाय दुकानदार किराणा साहित्य देत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांना मिळणारे जेवण कधीही बंद होऊ शकते. जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने ठेकेदाराचे थकवलेले बिल शासनातर्फे अदा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.