बालिंग्यातील सराफाकडून अनेकांना कोट्यवधीचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:25+5:302021-04-16T04:23:25+5:30
कोपार्डे : बालिंगा (ता. करवीर) येथील अंबिका ज्वेलर्सचे मालक सतीश पोवाळकर याने बालिंगासह आजूबाजूच्या पंधरा ते वीस गावांतील ...
कोपार्डे : बालिंगा (ता. करवीर) येथील अंबिका ज्वेलर्सचे मालक सतीश पोवाळकर याने बालिंगासह आजूबाजूच्या पंधरा ते वीस गावांतील ग्राहक, पिग्मीधारक, भिशी ठेवणाऱ्यांना आठ ते दहा कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा सराफ आपल्या पत्नीसह गायब असून त्याच्याविरोधात पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्याकडे फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दोनवडे (ता. करवीर) येथील सतीश पोवाळकर याचे बालिंगा येथे सोन्या-चांदीचे ज्वेलरी दुकान आहे. सतीशने आपल्या व्यवहाराने बालिंगा व आजबाजूच्या गावात विश्वासार्हता निर्माण केली होती. त्याने याच विश्वासाच्या आधारावर काही कर्मचारी नेमून पिग्मी गोळा करण्यास सुरुवात केली. प्रथम त्याने पिग्मीधारकांना चांगले व्याज दिल्याने आणखी विश्वासार्हता वाढली. पुढे दुकानातच सुवर्ण ठेव योजना सुरू केली. पिग्मी ठेवीचा कालावधी पूर्ण झाली की सुवर्ण ठेव योजनेत रक्कम गुंतवा व चांगले व्याज मिळवा, असे आमिष दाखविल्याने लाखो रुपयांच्या ठेवीही जमा झाल्या. सोनेतारण कर्जही कमी व्याजदरात देत असल्याने अनेकांनी त्याच्याकडे सोने तारण कर्जे घेतली. मुकुंद बुडके (बालिंगा) यांनी ऊसतोड मजुरांना पैसे देण्यासाठी २० तोळे सोने तारण ठेवून ४ लाख रुपये कर्ज घेतले आहे. १९ मार्चला हे कर्ज भागवले. सतीशने सोने दोन दिवसांत देतो म्हणून सांगितले पण ते अद्याप दिले नाही. असाच अनुभव नितीन माळी, अक्षनंदू तळवलकर, अमित ढेंगे (बालिंगा) यांनाही आला. पण गेली आठ दिवस त्याने सराफी दुकान उघडले नसल्याने फसवणूक झालेल्या ग्राहक, ठेवीदार व पिग्मी धारकांनी त्याच्या घरासमोर ठिय्या मारला. दोनवडे येथील त्याच्या घरी चौकशी केली असता तो पत्नीसह घरातून बेपत्ता असल्याचे सांगितले.
चौकट :
रोजंदारी व छोटा व्यवसाय करणारे अडकले
मोलमजुरी, भाजी विक्रेते व फेरीवाले व छोटे-मोठे दुकानदार यांच्याबरोबर मोठ्या व्यापाऱ्यांनी सतीशकडे सुवर्ण ठेव योजनेत लाखोंची गुंतवणूक केली आहे. फसवणूक झालेले जवळपास ५० ते ६० लोक आंबिका ज्वेलर्ससमोर जमले होते. १५ ते २० गावांतील लोकांची ८ ते १० कोटींची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.
चौकट :
नातेवाईकांकडून पोवाळकर बेपत्ता झाल्याची तक्रार :
सतीश पोवाळकर याच्या नातेवाईकांनी सतीश व पत्नी सुप्रिया बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. तर फसवणूक केल्याबद्दल विनायक गुरव (बालिंगा) यांनी उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्याकडे तक्रार दिली आहे.
कोट : आम्ही पती-पत्नी भाजीपाला विक्री करून सतीश पोवाळकर या सराफाकडे पिग्मी भरत होतो. तीन वर्षे ३ लाख ६८ हजारांची रक्कम जमा झाली होती. ती घर बांधणीसाठी ठेवली होती पण पोवाळकर बेपत्ता आहे. यामुळे आमची फसवणूक झाली आहे.
भाग्यश्री आयरेकर (पिग्मीधारक महिला, बालिंगा)
फोटो: १५ बालिंगा सराफ
बालिंगा (ता. करवीर) येथील आंबिका ज्वेलर्स सराफाकडून फसवणूक झाल्याचे समजताच अनेक ग्राहक, ठेवीदार दुकानासमोर जमले.