‘बाजारगेट’मध्ये ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फुटणार
By Admin | Published: October 24, 2015 01:01 AM2015-10-24T01:01:46+5:302015-10-24T01:07:34+5:30
नवोदित रिंगणात : कुंभार, जोशी-गोंधळी, मुस्लिम समाजाची मते निर्णायक
कोल्हापूर : रहिवासी, व्यापारी आणि सर्व जाती-धर्मांनी वास्तव्य असलेला प्रभाग म्हणून ‘बाजारगेट’ची ओळख आहे. या प्रभागात कुंभार, जोशी-गोंधळी व मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने या समाजाची मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. सर्वच उमेदवार विजयाचा दावा करत असले तरी या वेळेला या प्रभागात ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फुटणार असल्याचे दिसते.
बाजारगेट प्रभागात (क्रमांक ३१) आजपर्यंत या तिन्ही समाजाच्या मतांवरच निकाल ठरला आहे. या वेळेला हा प्रभाग ‘नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी) महिला’साठी राखीव झाला आहे. विद्यमान नगरसेवक श्रीकांत बनछोडे हे या प्रभागाचे प्रतिनिधी आहेत. श्रीकांत बनछोडे यांच्या विकासकामांच्या जोरावर व जनसंपर्कावर त्यांच्या स्नुषा उमा बनछोडे या काँग्रेसकडून मैदानात उतरल्या आहेत. त्यांचाही घरोघरी प्रचार सुरू आहे. त्याचबरोबर माजी नगरसेविका सुवर्णा सांगावकर यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहे. त्यांनी गेली तीन महिने प्रभाग पिंजून काढला आहे. विशेषत: त्यांना महिलावर्गातून पाठिंबा मिळत आहेत. त्यांनी वैयक्तिक गाठीभेटीवर जोर दिला आहे. निवडून आल्यावर प्रथम बाजारगेट प्रभागाचा पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे दीर माजी उपमहापौर चंद्रकांत सांगावकर यांच्या पूर्वीच्या खोलखंडोबा मतदारसंघात येणारी तेली गल्ली, नाभिक गल्ली एक बाजू या प्रभागात समाविष्ट झाल्याने त्याचा फायदा आहे.
या वेळेला माजी नगरसेवक नंदकुमार गजगेश्वर यांच्या नात्यातील शशिकला गजगेश्वर या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ शिवसेनेच्या पाठीशी राहिलेले भरत काळे यांच्या पत्नी मंगल काळे यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे जोशी समाजातील दुसऱ्या उमेदवार मंगल भरत काळे या अपक्ष म्हणून निवडणुकीत उभ्या आहेत. त्यामुळे जोशी समाजात मतांची विभागणी होऊन विरोधकांच्या पथ्यावर पडणार हे स्पष्ट असले तरी शशिकला गजगेश्वर व मंगल काळे यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा धडाका लावला आहे. या दोघीही आम्हाला जोशी समाजाचा पाठिंबा असल्याचा दावा करत आहेत.
त्याचबरोबर प्रणाली विक्रम मोतीपुरे या भाजप-ताराराणी आघाडीकडून कपबशी चिन्ह घेऊन लढत आहेत. त्यांनी सर्व भाग पिंजून काढला आहे. त्यांनाही पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून आफ्रिन मुश्ताक मुल्ला या आहेत. त्या ‘शिट्टी ’हे चिन्ह घेऊन निवडणूक लढत आहेत. त्यांनीही घरोघरी प्रचार सुरू केला आहे. एकंदरीत, बाजारगेट प्रभागातील मतदार आम्ही सर्वांच्या पाठीशी राहत असल्याचे सांगत आहे. त्यामुळे नेमका त्यांचा कल कोणाकडे हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे यावेळेला ‘बिन आवाजाचा बॉम्ब’ फुटणार असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)