बेंचना शास्त्रज्ञ, लेखक, कवी, थोर व्यक्तींची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:45 AM2018-07-23T00:45:36+5:302018-07-23T00:46:11+5:30
भरत बुटाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विद्यार्थी आणि बेंच यांच्यातील अतूट नातं सर्वश्रुत आहे. हेच बेंच जर शास्त्रज्ञ, थोर व्यक्तिमत्त्वं, संशोधक, लेखक, कवी, सिद्धांत यांच्या नावाने ओळखू लागले तर हे नातं अधिकच दृढ होईल. अशाप्रकारची ओळख देऊन बेंचना बोलकं करणारा नवोपक्रम दीपक शेटे यांनी मिणचे (ता. हातकणंगले) येथील आदर्श विद्यानिकेतनमध्ये राबविला आहे. १५० बेंचवर ३०० स्टिकरद्वारे हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढवीत आहे.
विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सोयीचे असणाऱ्या बेंचना शिकण्याचे माध्यम बनविण्याची कल्पना दीपक शेटे यांनी सत्यात उतरविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे प्रथम त्यांनी विद्यानिकेतनचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांना या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. मग बेंचना थोरांची तसेच अभ्यासातील विविध मुद्द्यांची नावे देऊन त्यांच्या छायाचित्रासह त्यांच्याविषयी संक्षिप्त माहिती बेंचवर कागदाद्वारे चिकटविण्याचे ठरविले. हा उपक्रम विद्यार्थ्यांकडूनच राबवून घेतला, तर त्याचा त्यांना अधिक फायदा होईल, या दृष्टिकोनातून काम सुरू केले. बेंचवरील अतिरिक्त जागेवर बसेल, एवढ्या ६ बाय १५ सें.मी. कागदावर विविध विषयांच्या छायाचित्रांसह संक्षिप्त माहितीचे संकलन करून घेतले. विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीच्या विषयांची निवड केली. कोणी गणितातला पायथागोरस निवडला, तर कोणी छत्रपती शाहू महाराज, ग. दि. माडगूळकर, न्यूटन, यूक्लिड, शेक्सपीअर, संत तुकाराम, वेन डायग्राम, आलेख, पृथ्वीची रचना, अमिबा अशी यादी लांबतच गेली. ठरलेल्या आकाराचा कागद घेऊन त्यावर डाव्या बाजूला चित्रे रेखाटली, तर उर्वरित जागेवर नाव व त्याबद्दलची संक्षिप्त माहिती लिहिली. अशी एक एक करत ३०० स्टिकर्स तयार झाली. सातवी ते दहावीच्या वर्गातील प्रत्येक बेंचवर दोन याप्रमाणे ही स्टिकर्स चिकटविली आहेत. दीपक शेटे यांच्या या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एक पर्वणीच मिळाली आहे.
उपक्रमाचे फायदे
थोरांच्या कार्याची ओळख सहजपणे उपलब्ध
स्वत:च निर्मिती केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेत वाढ
दररोज थोरांची माहिती विद्यार्थ्यांनी वर्गात सांगितल्याने सर्वांचा फायदा
अतिरिक्त वेळेचा सदुपयोग
आपणही असे काहीतरी बनावे, ही प्रेरणा त्यांच्यात जागृत
हा उपक्रम सर्वच शाळांनी राबविल्यास त्याचा शाळा, विद्यार्थ्यांना अधिक फायदा होईल.- प्राचार्य डी. एस. घुगरे,
आदर्श विद्यानिकेतन, मिणचे.
आकर्षक चित्रे, संक्षिप्त माहितीमुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्ये दिसून आली. विशेष म्हणजे त्या थोरांबद्दल जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणाही मिळाली.
- दीपक शेटे, अध्यापक