बाबासाहेबांच्या जयघोषात दुमदुमला बिंदू चौक, महामानवाला रांग लावून अभिवादन
By संदीप आडनाईक | Published: April 14, 2024 02:26 PM2024-04-14T14:26:21+5:302024-04-14T14:27:18+5:30
शहरातील विविध संस्था, राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकाऱ्यांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी दिवसभर रांग लावली होती.
संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: पांढऱ्या साडीतील महिला आणि निळे फेटे, निळे झेंडे, उपरणे, निळे टिळे लावलेले भीमअनुयायी बाबासाहेबांचा जयघोष करत भजन, भीमगाणी, पोवाडे, भाषणांद्वारे त्यांच्या विचारांचे स्मरण करत भारतीय राज्यघटनेने शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक बिंदू चौकातील त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत होते. शहरातील विविध संस्था, राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकाऱ्यांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी दिवसभर रांग लावली होती.
जयंतीनिमित्त बिंदू चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या हयातीतच उभारलेल्या जगातील त्यांच्या पहिल्या पुतळ्याला आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची रिघ लागली होती. मध्यरात्री आतषबाजी आणि विद्युत राेषणाईने बिंदू चौकात भारलेले वातावरण होते. शाहू छत्रपती तसेच आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी रात्रीच बाबासाहेंबाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
रविवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच भीमअनुयायांची गर्दी जमा झाली. दिवसभरात आमदार जयश्री जाधव, सदानंद डिगे, वसंतराव मुळीक, ईश्वर परमार, आमदार जयंत आसगांवकर, मालोजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई व इतर कार्यकर्ते, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संजीव झाडे, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, जयेश कदम, बाळासाहेब भोसले, तकदीर कांबळे, सुशीलकुमार कोल्हाटकर, संघसेन जगतकर, बंडा साळोखे, वैशाली सारंग, बाजीराव नाईक, बाळासाहेब वाईकर, ॲड. पांडुरंग कावणेकर, दीपाली कावणेकर आदींनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सिध्दार्थनगर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान, म्हेतर समुदाय यांच्यासह अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही महामानवाला अभिवादन केले.