बिंंदू चौकात या, कोणी घर भरले ते सांगतो: राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:52 AM2019-04-01T00:52:00+5:302019-04-01T00:52:04+5:30
कोल्हापूर : मी साखरसम्राटांकडून किती पैसे घेतले आणि तुम्ही महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाममधून किती पैसे कमावले याचा हिशेब मांडण्यासाठी ...
कोल्हापूर : मी साखरसम्राटांकडून किती पैसे घेतले आणि तुम्ही महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाममधून किती पैसे कमावले याचा हिशेब मांडण्यासाठी बिंदू चौकात या, असे खुले आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. कुणी कुणाशी कशी सेंटलमेंट केली आणि कोणी कोणी घरे भरली यांचा पंचनामाच करू, असाही इशारा दिला.
शुक्रवारी शिवसेना-भाजपचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीला मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेट्टींनी स्वत:चे घर भरल्याचा आरोप केला होता. या टीकेला शेट्टी यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत चर्चेसाठी समोरासमोर येण्याचे आव्हान पाटील यांना दिले आहे.
भाजप आघाडीसोबत होतो तेव्हा चंद्रकांत पाटील यांना मी विष्णूचा अवतार वाटायचो. आता बाजूला झालो तर लगेच घरे भरणारा कसा काय वाटू लागलो, याचे जरा आश्चर्यच वाटत असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, राज्याचे दोन नंबरचे खाते चंद्रकांतदादा सांभाळतात. दुसऱ्या अर्थाने ते दोन नंबरचे अवैध खातेही सांभाळतात.
भाजपमध्ये आजच्या घडीला १०० ते १२५ साखरसम्राटांचा भरणा आहे. ते त्यांचे आज्ञाधारक आहेत. मला पैसे दिले असे सांगणाऱ्या साखरसम्राटांना बिंदू चौकात येण्याचे आदेश द्यावेत. तेथे येऊनच त्यांनी कुणी किती पैसे दिले, कशी सेटलमेंट केली ते पुराव्यासकट सांगावे.
याचवेळी मीदेखील कार्यकारी अभियंते, ठेकेदार, कृषी अधिकारी, महसुलातील अधिकारी, कलेक्टर, तहसीलदार या सर्वांना बिंदू चौकातच बोलावून घेतो. तेथेच त्यांनी किती पैसे दिले याचा पाढाच वाचून दाखवतो. डांबरात, मातीत आणि खडीमध्ये किती खाल्ले याचा पंचनामाही करू; मग कुणी घर भरले याचा सर्वांसमक्षच सोक्षमोक्ष लागेल, असे आव्हानही दिले.
उसने मागणाऱ्यांकडे पैसा आला कोठून?
पाटील यांना मंत्री होण्याआधी पैसे उसने मागायला लागायचे. पैसे उसने मागणाºयांकडे आता ‘किती पैसे देऊ बोला,’ असे म्हणण्याइतपत पैसा आला कोठून याचाही हिशेब त्यांनी द्यावा, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.