बिंदू चौक सबजेलचे होणार स्थलांतर

By admin | Published: June 16, 2016 12:33 AM2016-06-16T00:33:26+5:302016-06-16T00:56:43+5:30

शासनाला प्रस्ताव सादर : कळंबा कारागृहाचा पर्याय, भाविकांसाठी भव्य पार्किंग व्यवस्थेचे नियोजन

Bindu Chowk will be shifted to Sabajel | बिंदू चौक सबजेलचे होणार स्थलांतर

बिंदू चौक सबजेलचे होणार स्थलांतर

Next

एकनाथ पाटील --- कोल्हापूर --स्वातंत्र्यपूर्व काळात शहराच्या मध्यवस्तीत सुरू झालेल्या बिंदू चौक सबजेलचे आता कळंबा मध्यवर्ती कारागृहात विलीनीकरण करण्यात येणार आहे. त्यासंबंधी कारागृह प्रशासनाने शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.
हे उपकारागृह कळंब्याला हलवून याठिकाणी महापालिका प्रशासनतर्फे ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
शहराच्या मध्यवस्तीत बिंदू चौकात १८४७ मध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी उपकारागृहाची (सबजेल) स्थापना करण्यात आली. सुमारे पावणेदोन एकरांत हे कारागृह वसले आहे. कारागृहाच्या सभोवती नागरी वस्ती, बिंदू चौक परिसर, अंबाबाई मंदिर असा संवेदनशील परिसर आहे. या कारागृहात १०४ कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. गुन्ह्यातील खटल्यामध्ये कच्चे व शिक्षा झालेले कैदी याठिकाणी बंदिस्त ठेवले जातात. कैद्यांची वाढती संख्या आणि कारागृहाच्या अपुऱ्या क्षमतेमुळे कळंबा येथे १९९० मध्ये जिल्हा कारागृह सुरू करण्यात आले. १९९१ मध्ये या कारागृहाला मध्यवर्ती कारागृहाचा दर्जा देण्यात आला. दाऊद, अरुण गवळी, आदी अंडरवर्ल्ड टोळ्यांमधील गुन्हेगारांसह विविध गुन्ह्यांंत शिक्षा झालेले मुंबई, ठाणे, कल्याण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणचे १६०० कैदी या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत. बिंदू चौक सबजेलमध्ये सध्या १०० पुरुष व २१ महिला कैदी आहेत. दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह ५० सुरक्षारक्षक आहेत. याठिकाणी न्यायालयीन कोठडी मिळालेले कच्चे कैदी ठेवले जातात. कारागृह नागरी वस्तीमध्ये असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना कारागृहाच्या उंचीपेक्षा जास्त मजली इमारती बांधण्यास परवानगी नाकारली आहे. कारागृहाच्या जागेवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व महापालिका प्रशासनाचा मालकी हक्क आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कारागृहाला लागून वाहनतळ सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. वाहनतळासाठी अन्यत्र जागा महापालिकेकडे उपलब्ध असली तरी ती मंदिरापासून लांब आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशस्त आहे. सबजेल त्याठिकाणी हलविल्यास ही जागा पार्किंगसाठी वापरता येईल, हा उद्देश समोर ठेवून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची बैठक झाली. त्यामध्ये बिंदू चौक सबजेल मध्यवर्ती कारागृहात हलविण्याचा निर्णय झाला. त्यासंबंधी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव शासनाला पाठविला. कळंबा कारागृहाचा संपूर्ण परिसर ३२ एकरांचा असला तरी १७ एकर जागेत खुले कारागृह आहे.
याठिकाणी कच्च्या कैद्यांना ठेवण्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीची तरतूद करण्याची शिफारसही जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
कारागृहात अंडरवर्ल्ड टोळ्यांमधील गुन्हेगारांचा समावेश.
उपकारागृह हलविण्यासंबधी जिल्हाधिकारी, महापालिका व कारागृह प्रशासनाची बैठक
प्रस्ताव गृह विभागाला सादर, लवकरच मंजुरीच्या प्रतीक्षेत

Web Title: Bindu Chowk will be shifted to Sabajel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.